
नगरपालिकेची परवानगी न घेताच इमारत बांधकाम केलेल्या अनधिकृत 13 कॉफी कॅफे सातारा नगरपालिका व सातारा पोलिसांनी सील केले. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नगरपालिकेने कॅफेचालकांना यापूर्वी नोटीस दिली होती.
शहरात अनधिकृत बांधकामे सुरू असून, काही ठिकाणी मंजूर आराखडय़ात बदल करूनही इमारती बांधल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. कॉफी कॅफेबद्दल नगरपालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. काही कॅफेंमध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींना बसण्यास मुभा दिली जाते. कॅफे सुरू करण्याबाबत आवश्यक असलेल्या परवानग्याही घेतल्या जात नाहीत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नगरपालिकेच्या शहर नियोजन विभागाने 13 जणांना नोटीस देऊन आवश्यक कागदपत्रे व खुलासा मागवला होता. मात्र, संबंधितांकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय या कॅफेंमध्ये तरुण-तरुणींना ‘प्रायव्हसी’ उपलब्ध करून दिली जात होती. त्यामुळे कंपार्टमेंट व पडदे काढून टाकण्याबाबतही नगरपालिका व पोलीस प्रशासनाने कॅफेचालकांना सूचना केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने सातारा पोलीस व नगरपालिकेच्या शहर नियोजन विभागाने कॉफी कॅफेंवर कारवाई केली.
कारवाई झालेल्यांमध्ये पॅराडाईज, ब्लॅक इन, द हीडन, फ्रेंड्स फोरेव्हर, हार्ट बीट, फ्रेंड्स या कॅफेंचा समावेश आहे. हे कॉफी कॅफे सेव्हन स्टार कॉम्प्लेक्स, गोडोली व विसावा नाका परिसरातील आहेत. संबंधितांनी आवश्यक परवानगी व कागदपत्रे सादर करावीत; अन्यथा अनधिकृत बांधकामप्रकरणी गाळे सील करून दंडात्मक कारवाई सुरू करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिला आहे. ही कारवाई शहर नियोजन विभागाचे भाग निरीक्षक सतीश साखरे, प्रकाश शिर्के, श्रीकांत गोडसे, अतिक्रमण हटाव विभागाचे प्रशांत निकम, सातारा पोलीस दलाचे राहुल खाडे, सुनील कर्णे, विकास शिंदे यांनी केली.




























































