कुतूहल म्हणून विमानाच्या लॅंडिंग गियर कपार्टमेंटमध्ये घुसला! 13 वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून थेट दिल्लीत पोहोचला

अफगाणिस्तानातील 13 वर्षांच्या चिमुकल्याच्या विमान प्रवासाने सर्वांनाच धक्का दिला आहे. काबूल विमानतळावर 13 वर्षांचा मुलगा कुतूहल म्हणून विमानाच्या लॅंडिंग गियर कपार्टमेंटमध्ये घुसला. तो तेथे गेल्याची कोणालाही कल्पना आली नाही. त्यामुळे तेथेच राहिलेला मुलगा काबूलमधून थेट नवी दिल्लीत पोहोचला. मुलाचा हा धक्कादायक प्रवास सोमवारी उघडकीस आला.

रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास केएएम एअरलाइन्सचे आरक्यू-4401 हे विमान दोन तासांचा प्रवास करुन नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यावेळी लहान मुलगा विमानाच्या लॅंडिंग गियर कपार्टमेंटमध्ये असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर विमान कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना धक्का बसला. त्या मुलाला तेथून सुखरुप बाहेर काढण्यात आले. नंतर त्याच विमानातून त्या मुलाला अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आले. दिल्ली विमानतळावरील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.

विमानतळ सुरक्षा नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मुलाबाबत अधिक माहिती घेऊन त्याला पुन्हा त्याच्या मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कुंदुज शहरातील रहिवासी असलेल्या मुलाला एअरलाइन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. नंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांनी अधिक चौकशीसाठी मुलाला विमानतळाच्या टर्मिनल 3 वर आणले होते, असे सूत्रांनी सांगितले.

मुलाने कुतूहल म्हणून विमानाच्या लॅंडिंग गियर कपार्टमेंटमध्ये प्रवेश केल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितले. केएएम एअरलाइन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी लँडिंग गियर कंपार्टमेंटची सुरक्षा तपासणी केली. यावेळी त्यांना लहान लाल रंगाचा स्पीकर आढळला. तो स्पीकर मुलाजवळ होता. संपूर्ण तपासणी केल्यानंतर विमान सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले.