बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही कारणास्तव दहावी, बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुक्त विद्यालयाची पहिली तुकडी मार्च 2020 मध्ये होणार्‍या दहावीच्या परीक्षेला बसणार आहे. मुक्त विद्यालयातून इयत्ता पाचवी आणि आठवी पास झालेल्या राज्यातील 148 विद्यार्थ्यांना 17 नंबरचा परीक्षा अर्ज भरण्याची परवानगी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये पाचवी आणि आठवीची परीक्षा पार पडली. पाचवीच्या 45 तर आठवीच्या परीक्षेसाठी 103 अशा एकूण 148 विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यालयाची परीक्षा दिली. पहिल्याच तुकडीचा निकाल हा 100 टक्के लागला असून हे सर्व विद्यार्थी दहावीची परीक्षा देण्यासाठी सज्ज झाले आहेत, असे मुक्त विद्यालयाचे राज्य समन्वयक सुभाष राठोड यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना मार्च 2020 मध्ये होणार्‍या दहावीच्या परीक्षेला तसेच त्यापुढील मार्चच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून बसण्याची परवानगी दिल्याचे राज्य शिक्षण मंडळ सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

मुक्त विद्यालय मंडळामार्फत जानेवारी 2020 मध्ये होणार्‍या पाचवी आणि आठवीच्या परीक्षेत पास होणारे विद्यार्थी मार्च 2021 मध्ये तसेच त्यापुढील मार्च महिन्यात होणार्‍या दहावीच्या परीक्षेस बसण्यास पात्र ठरणार आहेत.

सप्टेंबर 2019 मध्ये मुक्त विद्यालयाच्या दुसर्‍या तुकडीसाठी 300 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांची परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी 2020 मध्ये होणार आहे.  

दहावीची फेरपरीक्षा पास झाल्यास थेट बारावीची परीक्षा

जुलै-ऑगस्टमध्ये होणार्‍या दहावीच्या फेरपरीक्षेत पास झाल्यास विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या गॅपनंतर थेट बारावीची परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 17 नंबरचा परीक्षा अर्ज भरावा लागेल. तसेच मार्च 2018 मध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या गॅपनंतर म्हणजेच फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये बारावीची परीक्षा देता येणार आहे.