विभागात स्वाईन फ्लूचे आतापर्यंत १५ बळी, लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३८ वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर विभागात सप्टेंबर महिन्यापासून स्वाईन फ्लूचा सुरू झालेला उद्रेक थांबण्याचे नाव घेत नसून, आतापर्यंत ३८ जण या आजाराच्या विळख्यात सापडलेले आहेत. यापैकी १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयातून मिळाली.

विभागात संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होतो. स्वाईन फ्लू या आजाराचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वर्षाच्या सुरुवातीला स्वाईन फ्लूचा प्रभाव अत्यंत कमी होता. दुसऱ्या व चौथ्या महिन्यांत प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात या रोगाने चांगलेच पाय पसरायला सुरू केले. गेल्या पावणेदोन महिन्यात ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत १५ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये संभाजीनगर-१९, जालना- ३, परभणी-२ व इतर जिल्ह्यांमधील १४ रुग्णांचा समावेश आहे. यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये संभाजीनगर-६, बुलढाणा-३, जळगाव-२, यवतमाळ-१ व बीड-२ व नाशिक-१ या रुग्णांचा समावेश आहे. शहरातील घाटी रुग्णालयासह विविध खासगी रुग्णालयांत स्वाईन फ्लूबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घाटीत यासाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आला आहे.