लातूर मनपाच्या वतीने कराची थकबाकी भरणा न केलेल्या 15 मालमत्ता जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

शहरातील मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ता कराची थकबाकी अद्यापपर्यंत भरली नव्हती अशा 15 मालमत्ताची जप्ती मोहीम लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली व 30 लक्ष रुपये कर वसुल करण्यात आला.

लातूर शहरातील ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापपर्यंत कर भरणा केला नव्हता अशा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश आयुक्त एम.डी. सिंह यांनी कर वसुलीबाबत आढावा बैठकमध्ये दिले होते. त्यानुसार सहाय्यक आयुक्त शैला डाके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शहरात कारवाई केली. याकरिता आयोजित बैठकीमध्ये आयुक्त यांनी थकीत कर भरणा करण्याबाबत मालमत्ताधारकांनी दुरध्वनीवर स्वतः चर्चा करून कर भरणा करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यांच्याकडून कराची थकबाकी भरणा न केल्यास सदरील मालमत्ता जप्ती मोहीम त्वरित राबविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे सदरील कारवाई करण्यात आली.

यापुर्वी थकीत कर भरणा करण्याबाबत नोटीस निर्गमित केलेल्या आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावाही करण्यात येत होता. जेणेकरून महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारणा होऊन महानगरपालिका नागरिकांना अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवू शकेल. परंतु तरीही कर भरणा न केल्यामुळे सदरील कारवाई करण्यात आली. यापुढे सदरील कारवाई ही कडक करण्यात येणार आहे. तरी मालमत्ताधारकांनी कर भरणा करून लातूर शहर महानगरपालिकेस सहकार्य करावे व आपणावर होणारी जप्तीची कार्यवाही टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.