राज्यातील पंधरा हजार बोगस शेतकऱ्यांना पिक विमा नाकारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

पिक विम्यासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये तब्बल पंधरा हजार शेतकरी बोगस असल्याचे समोर आले आहे. या सर्वांची विमा हप्त्याची राशी जप्त केली असून या बोगस शेतकऱ्यांना विमा नाकारला आहे. या बोगसगिरीत बीड जिल्ह्यातील साडे अकरा हजार शेतकऱ्यांसह राज्यातील अन्य सात जिल्ह्यातील एकूण पंधरा हजार लोक बोगस शेतकरी असल्याचे घडकीस आले आहे.

दि ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप 2018 चे काम सोपवण्यात आले होते. या कंपनीने डुप्लिकेट अर्ज या सदरा खाली चौदा हजार पाचशे छपन्न आणि इतर एक्काहत्तर याप्रमाणे एकूण चौदा हजार नऊशे सत्तावीस अर्ज रद्दबातल ठरवले असून या शेतकऱ्यांना बोगस घोषित केले आहे. छानणी दरम्यान काही शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक वेळा विमा भरल्याच्या नोंदी केल्यामुळे हे शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे काही शेतकऱ्यांनी दिलेली कागदपत्र खोटी असून त्यात तफावत आढळली आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देय होणार नाही, असे आदेश झाले आहेत. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम केंद्र सरकारच्या ‘तांत्रिक निधी ‘ या खात्यात जमा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ताही परत मिळणार नाही.

दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील लाखावर शेतकरी फसवणूक करणारे अर्थात बोगस सापडले होते. मात्र आता या बोगसगिरीचे लोण पूर्ण राज्यात पसरत असल्याचे दिसत आहे.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने या बोगस ठरवलेल्या लोकांची नावे त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. आता या शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमची रक्कम देखील जप्त झाली. हे शेतकरी बोगस आढळल्याने या शेतकऱ्यांच्या अर्जासंदर्भात कंपनीने राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्याकडून कोणत्याही अनुदानाची मागणी केलेली नाही. त्यामुळे या लोकांना जरब बसणार असून बोगसगिरी करणारे उघडकीस येतील

बोगस शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करा 
बोगस विमा भरणाऱ्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. बोगस लोकांमुळे प्रामाणिक शेतकऱ्यावर ही कधी कधी अन्याय होतो विमा कंपनीसह राज्याच्या कृषी खात्याने हे काम चांगल्या पद्धतीने केले असून ते सरकार ने बोगस लोक उघडे केले आहेत असे मत अँड. अजित देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हा निहाय बोगस शेतकरी संख्या

बीड – 11518
उस्मानाबाद – 596
सोलापूर – 295
सातारा – 36
सांगली – 12
नाशिक – 95
रायगड – 143
जळगाव – 161
तसेच अन्य – 71
एकूण – 14927