हेरंब कुलकर्णींवर हल्ला करण्यासाठी 15 हजारांची सुपारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक कार्यकर्ते, लेखक, मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान, हल्ल्याप्रकरणी आणखी दोन फरारी आरोपींना तोफखाना पोलिसांनी पकडले आहे. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि. 13 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सनी ज्ञानेश्वर जगधने (वय 24, रा. रंगभुवन, सर्जेपुरा) व अक्षय कैलास माळी (वय 20, रा. घासगल्ली, कोठला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-साहित्यिक व येथील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब रामचंद्र कुलकर्णी (वय 52, रा. श्रमिकनगर, सावेडी) यांच्यावर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सावेडीतील प्रेमदान हाडको परिसरात लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला होता. हल्ला करणाऱया तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री पकडले होते. अक्षय विष्णू सब्बन (वय 30, रा. दातरंगे मळा), चैतन्य सुनील सुडके (वय 19, रा. बालिकाश्रम रस्ता) व एक अल्पवयीन मुलगा यांचा त्यामध्ये समावेश होता.

या गुह्यात सहभाग असलेले दोघे पसार झाले होते. त्यांनाही तोफखाना पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. पकडलेले हे दोन आरोपी घटना घडल्यापासून फरार झालेले होते, ते रेल्वेने जवळपास गेल्याची माहिती होत़ी त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला होता. मंगळवारी रात्री हे दोघेजण नगरमध्ये आले असल्याचे कळले होत़े  त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी त्यांचा शोध घेत अटक केली. या आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. या घटनेमध्ये आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

हेरंब रामचंद्र कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यासाठी या गुह्यातील मुख्य आरोपी अक्षय विष्णू सब्बन याने पसार असलेल्या सनी जगधने याला 15 हजार रुपयांची सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, दत्तात्रय जपे, सुनील शिरसाट, पोलीस नाईक संदीप धामणे, अविनाश वाक्चौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, सचिन जगताप, सतीश त्रिभुवन, संदीप गिऱहे, बाळासाहेब भापसे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, गौतम सातपुते, सतीश खोमणे यांनी केला असून, पुढील तपास मपोसई शुभांगी मोरे या करीत आहेत.

असा रचला कट

अक्षय सब्बन याची सुमारे 40 वर्षांपासून सीताराम सारडा विद्यालय परिसरात पानटपरी होती. हेरंब कुलकर्णी यांची जुलैमध्ये सीताराम सारडा विद्यालयात बदली झाली. त्यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार हाती घेताच विद्यालय परिसरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या अतिक्रमणातील टपऱया काढण्याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. जुलैच्या शेवटी मनपाने त्या सर्व टपऱया हटविल्या. 40 वर्षांपासून असलेली टपरी काढल्याचा राग सब्बन याच्या मनात होता. त्याने त्याच्या टपरीवर नेहमी येणाऱया सनी जगधनेकडे राग व्यक्त केला. कुलकर्णी यांना मारहाण करण्याचे बोलून दाखविले. जगधने तयार झाला. त्याने त्याच्या तीन पंटरांना सोबत घेतले. याचा पहिला प्रयत्न 20 सप्टेंबर रोजी झाला होता. कुलकर्णी विद्यालयात असताना सब्बन याने सांगितल्याप्रमाणे जगधनेचे पंटर कुलकर्णी यांना मारहाण करण्यासाठी आले होते; परंतु त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यांनी शनिवारी दुपारी कुलकर्णी यांना रस्त्यात गाठून लोखंडी रॉडने मारहाण केली.