
कोविड लसीकरणामुळे ‘त्या’ 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झालेला नसल्याचा निर्वाळा वैद्यकीय तज्ञांच्या राज्य स्तरीय उपसमितीने दिला आहे.
केंद्र सरकारने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 ते 17 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिनांक 3 जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात आले आहे. यात, मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रांवर आजमितीपर्यंत 1,46,944 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या वयोगटासाठी फक्त कोवॅक्सिन लसीचा वापर केला जात आहे.
दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी एका व्यक्तीने ट्वीटरवर, 15 वर्षीय मुलीचा लसीकरणामुळे मृत्यू झाला, अशी चुकीची बातमी प्रसारित केली. यानंतर या बातमीची सखोल तपासणी करून अहवाल बनवण्यात आला. लसीकरणानंतर घडणार्या प्रतिकूल घटनांची चिकित्सा करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वैद्यकीय तज्ञांची राज्य स्तरीय उपसमिती, मुंबई विभाग नेमण्यात आली आहे. सदर समितीची तातडीने बैठक आज, दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी झाली. सदर घटनेचा अहवाल समिती समोर सादर करण्यात आला. सदर मृत्यू लसीकरणामुळे झाला नाही, असे स्पष्ट मत समितीने दिले आहे.

























































