
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ४९० पदांच्या परीक्षेसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी मुंबईतील पवई येथे परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. मोठ्या संख्येने उमेदवार परीक्षा देण्यासाठी आले होते. मात्र वाहतूककोंडीमुळे परीक्षेला वेळेवर पोहोचता न आल्याने १५० हून अधिक उमेदवारांची परीक्षा हुकली. परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचल्यामुळे या उमेदवारांना आत प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या उमेदवारांनी आज केडीएमसीच्या मुख्य कार्यालयात धाव घेऊन निदर्शने करत पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली.
परीक्षेसाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर, कर्जत, उल्हासनगर आदी भागांतील उमेदवारांसाठी पवई येथे परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. मात्र हे केंद्र त्यांच्या राहत्या ठिकाणांपासून खूप दूर असल्याने आणि वाहतूककोंडीमुळे अनेकांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य झाले नाही. काहींना लोकल लेट असल्याचा फटका बसला तर काहींचा कल्याण-शीळ रोडवरील खड्डे आणि वाहतूककोंडीने घात केला. पवई येथील आयॉन डिजिटल केंद्रावर जाण्यासाठी उमेदवारांना विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकातून रिक्षा, टॅक्सी मिळण्यात अडचणी आल्याचे मयूर राठोड या परीक्षार्थीने सांगितले. आमच्या भवितव्याशी प्रशासनाने खेळ केल्याचा संतापही त्याने व्यक्त केला.
मी कल्याणमध्ये राहते. आज सकाळी परीक्षेला पवई येथे पोहोचण्यास फक्त पाच मिनिटे उशीर झाला. त्यामुळे मला परीक्षेला बसू दिले नाही.
– पूजा चौधरी, परीक्षार्थी.
डोंबिवली अथवा कल्याणसारख्या मध्यवर्ती ठिकाणी परीक्षा केंद्र गरजेचे होते. पालिका प्रशासनाच्या नियोजन अभावाचा फटका आम्हाला बसला.
– दिव्या सपकाळ, परीक्षार्थी.