
पबजी आणि टिकटॉक व्हिडिओ पाहण्यास आजीने विरोध केल्याच्या रागातून एका 16 वर्षांच्या मुलाने मोबाईलमध्ये चित्रीकरण करुन गळफास घेतला. ही घटना दोन दिवसांपुर्वी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीत घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बिबवेवाडीत राहणाऱ्या सचिनला (नाव बदलले आहे) पबजी गेम आणि टिकटॉक व्हिडिओ पाहण्याची सवय लागली होती. त्यामुळे त्याने दहावीनंतर शाळा सोडून दिली होती. त्याच्या वडिलांचे सहा वर्षांपुर्वी निधन झाले होते. तर आई कुटूंबासोबत राहत नव्हती. त्यामुळे सचिन आजीसोबत झोपडीत राहत होता. त्याला सातत्याने पबजी गेम खेळण्याची आणि टिकटॉक व्हिडिओचा नाद लागल्यामुळे तो काहीच कामधंदा करत नव्हता. त्यामुळे त्याची आजी सचिनला ओरडत होत. मी गेल्यावर तुझे काय होणार अशा आजीच्या संवादानंतर सचिनने काही काळ मोबाईलचा वापर कमी केला होता. काही दिवसांपूर्वी त्याने हप्त्याने नवीन मोबाईल घेतला होता. त्यावर सतत टिकटॉक व पबजी खेळत बसत होता. त्यावरून आजीने त्याला रविवारी दुपारी ओरडली होती. त्यामुळे चिडलेल्या सचिनने रविवारी पहाटे चारच्या सुमारास घरात टीव्ही सुरु केला. त्यानंतर मोबाईलवर चित्रीकरण सुरू करत साडीने घेऊन गळफास घेतला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहे.