
कोरोनाकाळात कडक लॉकडाऊन असताना दररोज 175 ते 200 टन कचरासंकलनाची खोटी बिले सादर करून पालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या ठेकेदार संस्थेला आता पोलीस चौकशीला सामोरे जावे लागून जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या कचरासंकलन करणाऱ्या या ठेकेदारावर फसवणूक, तसेच आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर येरलागड्डा यांनी दिला आहे. दरम्यान, महापालिकेत भाजपची सत्ता असताना हा घोटाळा झाला आहे.
नगर शहरात कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने 2019 साली ‘स्वयंभू ट्रान्स्पोर्ट’ या संस्थेला ठेका दिला होता. या ठेकेदार संस्थेने अधिकारी आणि पदाधिकाऱयांना हाताशी धरून कचरासंकलनात घोटाळा केला होता. या घोटाळ्याची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेनेचे गिरीश जाधव यांनी तत्कालीन भाजप सरकार आणि महापालिकेकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र, त्याची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठाविला.
नगर शहरातील नागरिक आपल्या कष्टाच्या कमाईतून कर भरत असताना, महापालिका अधिकारी आणि पदाधिकाऱयांना हाताशी धरून ठेकेदार हे पैसे हडप करीत असल्याचा आरोप जाधव यांनी केला होता. त्याबाबतचे तांत्रिक पुरावे आणि ठेकेदाराने सादर केलेली खोटी बिले, तसेच अधिकाऱयांनी अदा केलेल्या बिलांचे तपशील जाधव यांनी न्यायालयात सादर केले होते. त्यावर सुनावणी होऊन जाधव यांच्या याचिकेतील तथ्य गृहीत धरून गुन्हा दाखल करून पोलीस तपास करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
तर अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल होणार
तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकेलवार, तसेच मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनाही जाधव यांनी वादी केले होते. त्यावर न्यायालयाने पोलीस चौकशीअंती निर्णय घेतला जाईल. अधिकाऱ्यांविरोधात अपहाराचे पुरावे मिळाल्यास त्यांनादेखील आरोपी करण्यात यावे, असे आदेशात नमूद केले आहे.
शिवसेना आज पोलीस अधीक्षकांना भेटणार
2019 सालापासून असा प्रकार महापालिकेमध्ये सुरू होता. वेळोवेळी पत्र देऊनही याची दखल घेण्यात आलेली नव्हती. माहितीच्या अधिकारामध्ये या सर्व बाबी उघड झाल्या. साधारणतः दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. यामध्ये तत्कालीन अधिकाऱयांचाही समावेश असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप जाधव यांनी सांगितले.

























































