
जन्मल्यानंतर दहाव्या दिवशी बाळ कोरोना संक्रमित झाले. मात्र घाबरलेल्या आईवडिलांनी धीर खचू न देता त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. 18 दिवस ऑक्सिजनवर असणाऱया या चिमुकल्याने अवघ्या 24 दिवसांत कोरोनावर मात केली.
अमरावती जिह्यातील वरुड तालुक्यातील अपेक्षा मरस्कोल्हे यांच्या बाळाला जन्माच्या दोन दिवसांतच सतत ताप येत असल्यामुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सतत येणाऱया तापामुळे डॉक्टरांनी त्याची आरटीपीसीआर चाचणी असता बाळाला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. दरम्यानच्या काळात श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याने त्याच्यावर अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू केले.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक उपचारांची गरज आणि आयसीयू बेडची कमतरता यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला शहरातीलच होप रुग्णालय दाखल करण्यात आले. नवजात शिशुतज्ञ डॉ. अद्वैत पानट यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर उपचार करण्यात आले.
श्वसनाचा त्रास वाढतच असल्यामुळे बाळाला पहिले तीन दिवस अत्याधुनिक सीपीएपी मशीनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला. रेमडेसिविर व हाय फ्लो ऑक्सिजनच्या परिणामी पाच दिवसांनंतर श्वसनात सुधार दिसू लागला. इंटेन्सिव्ह उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिरावली. अठराव्या दिवशी बाळाच्या कृत्रिम ऑक्सिजन पुरवठय़ाची गरज संपली आणि बाळ कोरोनाच्या संकटातून बाहेर आले.
































































