2 लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची रक्कम व्याजासकट परत केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळ्यातील एका व्यापाऱयाने बोरिवलीतील 75 वर्षीय इलेक्ट्रॉनिक डीलरला 2 लाख 16 हजार रुपयांना चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणूकप्रकरणी डीलरने बोरिवलीतील दंडाधिकारी न्यायालयात धाव घेताच आरोपी ताळ्यावर आला आहे. आरोपीने सेटलमेंट करत 2 लाख 16 हजार 713 रुपयांच्या मूळ रकमेसह अतिरिक्त 72 हजार 125 रुपये डीलरला परत केले आहेत.

बोरिवली येथील जसूभाई वघाणी (75) यांचे जेपी इलेक्ट्रॉनिक हे शोरूम असून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे डीलर आहेत. भायखळा येथील व्यापारी समीन शेख याने वघाणी यांच्या शोरूममधून 2019 साली मे ते नोव्हेंबरदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेतली. मात्र त्याचे पैसे दिलेच नाहीत त्यानंतर वघाणी यांना व्यापाऱयाने अनेक महिन्यांनंतर 2 लाख 16 हजार रुपयांचा चेक दिला, पण तो चेक बाऊन्स झाला. याप्रकरणी वघाणी यांनी बोरिवलीच्या दंडाधिकारी न्यायालयात 16 जानेवारी 2020 रोजी तक्रार नोंदवली. याची दखल घेत न्यायाधीश एस. डी. कामत यांनी आरोपीविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले तेव्हा आरोपी व्यापाऱयाने सर्व पैसे देण्याचे मान्य केले. मात्र 75 वर्षीय जसूभाई यांनी न्यायालयात स्वतŠ युक्तिवाद करत आपली फसवणूक झाल्याचे न्यायालयाला पटवून दिले तसेच मूळ रकमेसह व्यापाऱयाला दंड ठोठावण्याची मागणी न्यायाधीशांना केली. यामुळे घाबरलेल्या आरोपी व्यापाऱयाने तडजोड करण्याचे कबूल करत मूळ रक्कम आणि त्याव्यतिरिक्त 72 हजार रुपये देण्याचे मान्य केले. न्यायालयाने याची दखल घेत सदर प्रकरण निकाली काढले.