
सामना प्रतिनिधी । मालवण
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील देवबाग तारकर्लीसह वीस ठिकाणी समुद्री धूप प्रतिबंधक बंधारे व देवबाग, मेढा, विजयदुर्गसह चार ठिकाणी जेटी उभारण्यास पर्यावरण विभागाची सीआरझेड (एमसीझेडएमए) मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेर खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे, अशी माहिती मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक मच्छीमार, ग्रामस्थांना मोठी समस्या भेडसावत असलेल्या समुद्री उधाण, पाणी शेती तसेच अन्य ठिकाणी घुसत असल्याने याठिकाणी जेटी व धूप प्रतिबंधक उभारावे अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने मंत्रीमंडळ व सभागृहात लक्ष वेधले होते.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व परिपूर्ण प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवून देखील पर्यावरण विभागाच्या सीआरझेडच्या नियमामुळे या कामांना अंतरिम मंजुरी मिळण्यास अडचणी येत होत्या. यासंदर्भात राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर गुरुवारी मंत्रालयात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपल्या दालनात बैठक घेतली. या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, पर्यावरण विभागाचे ई. रवींद्रन, पतन विभागाच्या रूपा राऊळ-गिरासे यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अन्य अधिकारी, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवबाग ते तारकर्ली, मसुरकर जुवा बेट, मसुरकर खोतजुवा, हिंदळे, वानिवडे, सागरेश्वर, भोगवे, मिठमुंबरी, मुणगे, बागमाळगाव व रत्नागिरी जिल्ह्यातील सोमेश्वर, वरवडे, पोमेंडी, जुवे, पाजपंढरी, कर्डे, पडेले, उत्तबर, अंजर्ले, खेड याठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे व देवबाग-कर्ली, विजयदुर्ग, मेढा व बोर्या येथे जेटी उभारण्यास पर्यावरण विभागाची सीआरझेड (एमसीझेडएमए) ची मान्यता मिळाली आहे.
याबाबतचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी एलईआयएए या समितीकडे पाठविण्यात आला आहे. पुनर्बांधणी ज्याठिकाणी आवश्यक आहे अशा कामांना सीआरझेडची कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या चर्चेदरम्यान स्पष्ट केले.































































