संकटकाळी डायल करा ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अमेरिकेच्या धर्तीवर आता हिंदुस्थानमध्येही संकटकाळात मदतीसाठी 112 हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 20 राज्ये आणि केंद्रशासित राज्यांमध्ये संकटकाळात नागरिक 112 या हेल्पलाईन क्रमांकावर डायल करुन मदत मागू शकणार आहेत. याआधी पोलीस मदतीसाठी 100 क्रमांक, अग्निशमन दलासाठी 101 क्रमांक, महिलांच्या मदतीसाठी 1090 हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले होते. पण यापुढे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत मदतीसाठी 112 हा एकमेव क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. ही योजना केंद्र सरकारच्या निर्भया फंडतर्फे लागू करण्यात आली आहे.

20 राज्य व केंद्रशासित राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रेदश, तेलंगाना, तमिळनाडू, गुजरात, पुद्दुचेरी, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, दादर आणि नगर हवेली, दमन आणि दीव, जम्मू आणि कश्मीर आणि नागालँडचा समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला कुठल्याही आपातकालिन परिस्थितीसाठी एकच मोफत टोल क्रमांक जारी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत आतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेला 112 हा एकच आपात्कालीन क्रमांक देण्यात येणार आहे.

हे अॅप मोबाईलमध्ये अपलोड केल्यावर 10 जवळच्या व्यक्ती किंवा मित्रांचे मोबाईल क्रमांक त्यात जोडले जाणार आहेत. यामुळे संकटात सापडलेली व्यक्ती जेव्हा 112 हा क्रमांक डायल करेल तेव्हा या क्रमांकाशी जोडले गेलेल्या व्यक्तींनाही मदतीची गरज असलेल्या व्यक्तिचा ठाव ठिकाणा कळेल. हिंदी, इंग्रजी, पंजाबीसह इतर अनेक भाषांमध्ये हे अॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.