
यंदाच्या धनत्रयोदशीला शुक्रवारी ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात सोन्याची खरेदी केली. गेल्यावर्षीच्या (2019) तुलनेत यंदा धनत्रयोदशीला 30 टक्के जास्त सोन्याची विक्री झाली. ग्राहकांनी यंदाच्या धनत्रयोदशीला 20 हजार कोटीपर्यंत सोन्याची खरेदी केली, अशी माहिती इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) या ज्वेलर्सच्या संघटनेने दिली. आयबीजेएच्या माहितीनुसार, यंदा धनत्रयोदशीला देशभरात 40 टन सोन्याची विक्री झाली. त्याची किंमत 20 हजार कोटी आहे.
मागच्यावर्षी देशभरात 12 हजार कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली होती. यंदा हाच आकडा 20 हजार कोटींच्या घरात आहे, अशी माहिती ‘आयबीजेए’ चे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र मेहता यांनी वृत्तसंस्थेला दिली. ‘गेल्या वर्षी धनत्रयोदशीला 30 टन सोन्याची विक्री झाली होती. यंदा 40 टन सोन्याची विक्री झाली, असे मेहता म्हणाले. 2019 च्या तुलनेत 30 ते 35 टक्के विक्री वाढली, तर सोन्याची किंमत 70 टक्क्याने वाढेल, असे त्यांनी सांगितले.

























































