
गुजरातमधील अहमदाबाद येथे 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने 38 दोषींना फाशीची, तर 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. या बॉम्ब हल्ल्यामध्ये 56 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.
2008 Ahmedabad serial bomb blast case | A special court pronounces death sentence to 38 out of 49 convicts pic.twitter.com/CtcEWGze2z
— ANI (@ANI) February 18, 2022
बॉम्बस्फोटाचे हे प्रकरण गेल्या 13 वर्षांपासून न्यायालयात होते. 8 फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एआर पटेल यांनी 49 आरोपी दोषी असल्याचा निकाल दिला होता. तर 77 मधील 28 आरोपींना पुरेश्या पुराव्या अभावी मुक्त करण्यात आले होते. दोषी ठरवण्यात आलेल्या 49 जणांना आज शिक्षा सुनावण्यात आली. बचावपक्षाच्या वकिलांनी कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी धुडकावून लावत न्यायालयाने 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली.
दरम्यान, सदर बॉम्बस्फोट प्रकरणी याआधी 2 फेब्रुवारी रोजी निकाल दिला जाणार होता. परंतु विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एआर पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हा निर्णय 8 फेब्रुवारीपर्यंत लांबला होता. न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावण्यासह मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये, गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 25 हजार रुपये भरपाई देण्याचेही आदेश दिले.
काय आहे प्रकरण?
अहमदाबाद येथे 28 जुलै 2008 रोजी एकामागोमाग एक 21 साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 56 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यावेळी तात्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही गुजरातला भेट दिली होती.
19 दिवसात 30 दहशतवाद्यांना अटक
तात्कालिन डीजीपी आशिष भाटिया नेतृत्वाखालील पथकाने 19 दिवसांमध्ये 30 दहशतवाद्यांना अटक केली होती आणि यानंतर उर्वरित दहशतवाद्यांना अटक झाली होती. इंडियन मुजाहिद्दीनने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या संघटनेनेच अहमदाबादआधी जयपूर आणि वाराणसीमध्ये बॉम्बब्लास्ट केले होते.
























































