
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँगेस दिल्लीत आपबरोबर आघाडी करणार नाही. दिल्लीत लोकसभेच्या सर्व सात जागांवर काँगेस स्वबळावर लढणार आहे, असे काँगेसच्या प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित यांनी आज येथे जाहीर केले. दिल्लीत भाजपला रोखण्यासाठी आप-काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याची चर्चा असतानाच दीक्षित यांनी आज ही घोषणा केली आहे.
आम आदमी पार्टीबरोबर आघाडी करायची नाही, असे आम्ही एकमताने ठरवले आहे. आम्ही स्वबळावर लढणार आणि विजयी होणार असे काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर दीक्षित यांनी पत्रकारांना सांगितले. काँगेसचा भाजपबरोबर दिल्लीत गुप्त समझोता, आघाडी झालेली आहे. ही अपवित्र आघाडी आहे, अशी टीका मुख्यमंत्री आपचे नियंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केली. आपशी आघाडी करणार नाही असे शीला दीक्षित यांनी घोषित करताच केजरीवाल यांनी ही टीका केली आहे.





























































