
2025 वर्ष जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खूप आव्हानात्मक राहिले. अर्थतज्ञांच्या मते, नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जगभरातील कंपन्यांनी 11.7 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे. 2020 मधील कोरोना महामारीच्या काळातील 22 लाख कपातीनंतरचा हा मोठा आकडा आहे. 2024 च्या तुलनेत त्यामध्ये 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विकास दरात घट, एआय ऑटोमेशनचा वाढता वापर, महामारीनंतरची अतिरिक्त कर्मचारी भरती ही यामागील प्रमुख कारणे आहेत. तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि बँकिंग- वित्तीय क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे
जानेवारीपासून जगभरातील किमान 4286 कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. तंत्रज्ञान क्षेत्र यात आघाडीवर आहे. रिटेल आणि वेअरहाऊसिंग क्षेत्रातही लक्षणीय कपात दिसून आली. अमेरिकेत रिटेल क्षेत्रातील कपात मागील वर्षीच्या तुलनेत 145 टक्क्यांनी वाढली. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते, विकसित अर्थव्यवस्थांमध्ये बेरोजगारीत 12 टक्के वाढ झाली आहे. ई- कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या ऍमेझॉनने आपल्या तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. जागतिक कपातीमध्ये अमेरिकेचा वाटा सर्वात जास्त आहे. अमेरिकेन कंपन्यांमध्ये ऑक्टोबरपर्यंत 10,99,500 नोकऱ्यांमध्ये कपात करण्यात आली, तर नोव्हेंबरमध्ये ही संख्या 11.7 लाखांच्या पुढे गेली.
हिंदुस्थानात काय परिस्थिती…
हिंदुस्थानात नोकर कपात छुप्या स्वरूपात आहे. आयटी सेवा क्षेत्रात 50 हजार नोकऱ्या वर्षाअखेरीस कमी होण्याची भीती आहे. टीसीएसने 12 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. 2030 पर्यंत या क्षेत्रात पाच लाख नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. ऍडटेक आणि फिनटेक कंपन्यांना सर्वाधिका फटका बसला आहे. नोव्हेंबरपर्यंत 50 हून अधिक स्टार्टअप्सनी 6716 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.


























































