कांदळगावकरांच्या गणेशाला 21 पदार्थांचा महानैवेद्य; तारामुंबरीत 14 परिवाराचा एक गणपती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात प्रत्येक जण गणेश चतुर्थीचा सण मोठय़ा आनंदाने आणि मोठा आर्थिक खर्च करून आपापल्या गावी हा सण उत्साहाने साजरा करत असतो. मग त्यात गणेशाच्या आगमनापासून गणेशाच्या विसर्जनापर्यंतच्या मिरवणुका असो वा बाप्पांना विविध प्रकारचे नैवेद्य दाखविण्याच्या प्रथा असो. विविध प्रकारचे नैवेद्य म्हणजे भक्तांना वेगवेगळ्या चवींचे नैवेद्य चाखण्याची रेलचेलच. अशीच एक प्रथा कोकणातील सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड तालुक्यात तारामुंबरी गावामध्ये कांदळगावकर कुटुंबीयांच्या घरच्या गणपतीला 21 प्रकारच्या गोड, तिखट, चविष्ट पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे.

कांदळगावकर कुंटुंबातील 14 परिवारांचा एकत्रित गणपती विराजमान होतो. या गणपतीलाच महानैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. कांदळगावकर कुंटुंब आणि घरच्या माहेरवाशिणी एकत्र येत हा महानैवेद्य गणेश चतुर्थीच्या पहिल्या पाच दिवसांपैकी एका दिवशी श्रीगणेशास अर्पण करतात. या वेळी संध्याकाळच्या महाआरतीनंतर हा महानैवेद्य उपस्थित सर्वांना वाटला जातो. असा हा 21 प्रकारच्या पदार्थांचा महानैवेद्याचा पारंपरिक कार्यक्रम यंदा रविवार, 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून उत्साहात संपन्न झाला.

नैवेद्यातील पदार्थ…
घरी बनवलेले रंगीत मोदक, चॉकलेट मोदक, करंज्या, खरवस, गुलाबजाम, रसगुल्ले, खोबऱयाच्या वडय़ा, पेठा, अळुवडी, कोथिंबीर वडय़ा, लाडू, केक, बंगाली खाजा आदी जवळपास 27 पदार्थ यावेळी बनवण्यात आले.