दहा हजारांच्या बिनव्याजी कर्जासाठी 22 हजार फेरीवाल्यांचे पालिकेकडे अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना काळात व्यवसाय बुडालेल्या दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्राच्या ‘स्व-निधी’ योजनेंतर्गत दहा हजारांचे बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी पालिकेकडे तब्बल 22 हजार फेरीवाल्यांनी अर्ज केले आहेत. या उपक्रमात कर्ज घेण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून प्रोत्साहनही देण्यात येत आहे. पालिकेच्या तपासणीनंतर बँकांच्या माध्यमातून फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोना काळात हातावर पोट असलेल्या अनेक गोरगरीबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. या काळात पालिकेने हजारो लोकांना दोन वेळचे मोफत जेवणही पुरवले. कोरोना काळात धंदा बुडालेल्या परवाना असलेल्या आणि परवाना नसलेल्यांसाठी केंद्राकडून आर्थिक सहाय्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी विभागनिहाय अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत महिनाभरात 340 कॅम्प आयोजित करण्यात आले, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी दिली. दरम्यान, या कर्जाची परतफेड सुलभ हप्त्यांत आणि वेळेत केल्यास पुढील कर्ज जुन्या प्रकरणाच्या धर्तीवर तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ऑनलाइन पोर्टलवर अर्ज
अर्ज कसा भरावा याची माहिती देऊन ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. फेरीवाल्यांकडे परवाना आहे अशा अर्जाची प्रक्रिया सुलभ आहे, परंतु ज्यांच्याकडे परवाना नाही अशा फेरीवाल्यांसाठीही लेटर ऑफ रेकमंडेशन (एलओआर) नुसार अर्ज केले जात आहेत.
कर्ज मिळवण्यासाठी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केले जात आहेत. एकदा अर्ज केल्यानंतर फेरीवाल्यांना एलओआर उपलब्ध होतो. एलओआर उपलब्ध झाल्यानंतर आणखी एक अर्ज हा दुसऱया टप्प्यात करावा लागतो. अनेक फेरीवाल्यांकडून एलओआर मिळवले जात आहे.