
कोरोनासारख्या महामारीमुळे आयटी क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील अनेकाच्या नोकऱ्य़ा गेल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यात जवळपास 24 टक्के घरकामगारांच्या नोकऱ्य़ा गेल्या असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. तर 62 टक्के घर कामगारांचे अंशत बेरोजगार असल्याचे देखील यानिमित्ताने समोर आले असून राज्यातील 100 टक्के घर कामगारांना आरोग्य सुरक्षा नसल्याची माहिती आता प्रकाशात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘नॅशनल डोमेस्टीक वर्कर्स वेलफेअर ट्रस्ट संस्थेतर्फे राज्यभरातील घर कामगारांच्या प्रश्नांबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यातील एकूण सात जिल्ह्यातील 5,578 घरकामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी वरील बाब समोर आली आहे. हे सर्वेक्षण आणि घर कामगारांच्या विविध मागण्यांचे एक निवेदन महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार समन्वय समितीतर्फे राज्य सरकारला देण्यात आले आहे.
या अहवालानुसार केवळ 14 टक्के घर कामगारांचे काम सुरु आहे. तर यानुसार तब्बल 33 टक्के घरांमध्ये वयोवृध्द कामगार कार्यरत आहेत. 5,578 जणांपैकी 2,580 म्हणजेच 46 टक्के घर कामगारांकडे स्वतःचे घर नाही. यापैकी बहुतांश कामगार हे भाडय़ाच्या घरात राहत असून त्यापैकी 46 टक्के कामगारांचे घरभाडे थकलेले आहे. तर या महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकांच्या घरात शिक्षणाची समस्या देखील निर्माण झाल्या असून राज्यात एकूण 66 टक्के घर कामगारांच्या घरात आज शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे दिसून आले आहे.
काय आहेत मागण्या
- वरील सर्व समस्या पाहता राज्य घरेलु कामगार समन्वय समितीतर्फे राज्य सरकारला एक निवेदन देण्यात आले असून खालील मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी संघटनेचे उदय भट यांनी यावेळी केली आहे.
- कल्याणकारी मंडळ पुर्ण क्षमतेने चालवा आणि त्यात भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी.
- उदरनिर्वाहासाठी घर कामगार फळ, भाजी, कपडे व इतर वस्तू विक्री करत असतील तर त्यांना पथविक्रेता प्रमाणपत्र देण्यात यावे.
- घर कामगारांना आर्थिक सहाय्य म्हणून प्रत्येकी रुपये 10,000 देण्यात यावे.
- घर कामगार /असंघटीत महिलांचे बचत गट असतील त्यांना विशेष मान्यता देण्यात यावी व व्यवसायाची परवानगी देण्यात यावी.






























































