
सामना प्रतिनिधी । जळगाव
खान्देश म्हणजे खवय्यांचा विभाग. भरीत हा जळगाव जिल्ह्यातील मुख्य खाद्यपदार्थ आहे. शहरातील मराठी प्रतिष्ठानकडून 2 हजार 500 किलो वांग्याचे भरीत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली बनविले जाणार असून यासाठी तयार केलेल्या महाकढईची सोमवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
खान्देशातील वांग्याचे भरीत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून देश विदेशात भरीत प्रसिद्ध होण्यासाठी मराठी प्रतिष्ठानने भरीत महोत्सव आयोजित केला आहे. शहरातील काव्यरत्नावली चौकापासुन महाकढईच्या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शोभायात्रेच्या प्रारंभी उद्योजक सुबोध चौधरी, सुनिल चौधरी यांच्या हस्ते कढईचे औक्षण करण्यात आले. शोभायात्रेच्या अग्रभागी दुचाकीची रॅली काढण्यात आली. त्यानंतर ट्रॉलीवर महाकाय कढई ठेवण्यात आली होती. 21 डिसेंबर रोजी तयार करण्यात येणाऱ्या 2 हजार 500 किलो वांग्याचे भरीताच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद होण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. काव्यरत्नावली चौक येथुन सुरू झालेली ही शोभायात्रा आकाशवाणी चौक, बसस्थानक, स्टेडीयम चौक, शिवाजी चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, मार्गे परत काव्यरत्नावली चौकात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

































































