अडीच हजार लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, नऊ महिन्यांत घेतले साडेतीन कोटी रुपये

निकषात बसत नसतानाही ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱया लाखो महिलांना सरकारकडून आजपर्यंत अपात्र ठरवण्यात आले आहे. आता यामध्ये आणखी एक नवी धक्कादायक बाब उघड झाली आहे. आतापर्यंत केलेल्या पडताळणीमध्ये अडीच हजार लाडक्या बहिणी या सरकारी कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी गेल्या नऊ महिन्यांमध्ये या योजनेतून साडेतीन कोटी रुपये घेतले आहे. त्यांच्या पगारातून ती रक्कम वसूल केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ गरीब व गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली. सरकारी नोकरी असलेल्या महिलांना त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही असा स्पष्ट निकष होता. त्यानंतरही सरकारी नोकरी करणाऱया 2652 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यांचा पगार ज्या बँकेत जमा होतो त्याच खात्यात योजनेचे पैसे जमा झाले तरीही आजवर सरकारला समजले नव्हते. पडताळणीनंतर तो प्रकार उघड झाला. या महिला वर्ग-3 आणि वर्ग-4 श्रेणीतील सरकारी कर्मचारी आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने ‘लाडकी बहीण योजने’तील 1 लाख 60 हजार लाभार्थी महिलांचा यूआयडी डाटा राज्य सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाला पडताळणीसाठी उपलब्ध करून दिला होता. त्यातून आतापर्यंत इतक्या सरकारी नोकर महिला सापडल्या आहेत. हा आकडा अजूनही मोठा असू शकतो असा अंदाज आहे.

फसवणुकीबद्दल कारवाई होणार

गेल्या नऊ महिन्यांमध्ये या महिलांनी ‘लाडकी बहीण योजने’तून प्रत्येकी साडेतेरा हजार रुपये घेतले आहेत. ती एकूण रक्कम 3 कोटी 58 लाख रुपये होते. या महिला ज्या विभागांमध्ये काम करतात त्या विभागांना याबाबत कळवण्यात आले आहे. त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याबरोबरच सरकारची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा विचार सुरू असल्याचे सांगितले जाते.