हिंगोलीत चोरीतील चौदा लाखाच्या सव्वीस दुचाकी जप्त

578

नांदेड व हिंगोली जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणाहून चोरी करून विक्री केलेल्या १४ लाख २५ हजार रुपयांच्या २६ दुचाकी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार व  पथकाने आज शनिवारी  जप्त केल्या. चोरीतील बहुतांश दुचाकींची नांदेड जिल्ह्यातून चोरी करून त्या हिंगोली जिल्ह्यात विक्री केल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून, चोरट्याकडून आणखी दुचाकीच्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक भंडरवार यांनी व्यक्त केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात जुन्या दुचाकींची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी शोध घेत चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्यांची माहिती घेतली. आखाडा बाळापूर ठाण्याच्या हद्दीतील जवळा पांचाळ, सालेगाव, रेडगाव, दांडेगाव, टोकाई कारखाना, रामेश्वर तांडा, तसेच वसमत तालुक्यातील कुरूंदा येथेही चोरीच्या दुचाकी विक्री झाल्याचे पुढे आले. त्यानंतर दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.  त्यावेळी नांदेड शहरातील जय हनुमान सोसायटीतील देविदास बाबुराव कांबळे (३०) याचे नाव समोर आल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले.

देविदास कांबळे याला  ताब्यात घेत अधिक चौकशी केल्यावर त्याने पोलिसांसमोर चोरीची कबुली दिल्याचे पीआय भंडरवार यांनी सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरून आखाडा बाळापूर- शेवाळा रोडवरून एक दुचाकी चोरली. तर इतर दुचाकी नांदेडच्या विविध भागातून चोरल्या. देवीदास कांबळे याने विक्री केलेल्या १४ लाख ८० हजार रूपयांच्या २६ दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या आहेत. देवीदास कांबळे याच्याकडून आणखी दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि जगदीश भंडरवार, पोउपनि एस.एस.घेवारे, पोउपनि किशोर पोटे, पोलीस कर्मचारी संदीप जाधव, सुनील अंभोरे, बालाजी बोके, विलास सोनवणे, शंकर जाधव, विशाल घोळवे, शंकर ठोंबरे, विठ्ठल कोळेकर, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, दिपक पाटील यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या