तळिये गावातील 261 घरे म्हाडा प्री फॅब तंत्रज्ञानाने बांधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्ह्यातील तळिये गावातल्या  सर्व सातही वाडय़ांमधील 261 घरांची उभारणी  म्हाडा प्री फॅब तंत्रज्ञानाने करणार आहे. तळिये गावातील रहिवाशांसाठी या घरांची बांधणी वेळेत पूर्ण करावी, असे आदेश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिले.

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत दरड कोसळून संपूर्ण तळिये गाव गाडले गेले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त तळिये गावाला भेट देऊन ग्रामस्थांचे अश्रू पुसताना ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याची घोषणा केली होती. कोणालाही वाऱ्य़ावर सोडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना धीर दिला होता. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडामार्फत तळिये गावातील घरे बांधण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर तळिये गावाच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयात जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग राज्यमंत्री व  रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, रायगडच्या जिल्हाधिकारी  निधी चौधरी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मुख्याधिकारी योगेश म्हसे, म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे,उपसचिव सुनील तुंबारे उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन विभागाचा निधी

तळिये गावातील घरांच्या पुनर्बांधणीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडाला जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच तेथे रस्ते, वीज, पाणी, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानुसार म्हाडाने लेआऊट तयार करून त्याचा विकास एजन्सी म्हणून करावा. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱयांनी पुढील आठवड्यात तळिये येथे जाऊन जागेची पाहणी करावी अशी सूचना त्यांनी केली.