
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत हिंदुस्थानमध्ये कोरोनाचे 151 रुग्ण आढळले आहेत. तर परदेशात 276 हिंदुस्थानींन कोरोनाची लागण झाली आहे. सर्वाधिक हिंदुस्थानी रुग्ण ईराणमध्ये आढळले आहेत. परराष्ट्र खात्याने ही माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार परदेशात 276 जणांना कोरोना संक्रमित झाला आहे. त्यात ईराणमध्ये सर्वाधिक हिंदुस्थानींना कोरोनाची लागण झाली त्यांची संख्या 255 इतकी आहे. त्याशिवाय, इटलीत 5, हाँगकाँगमध्ये, कुवैत, श्रीलंकेत एक तर सौदी अरेबियामध्ये 12 हिंदुस्थानी रुग्ण आहेत.
इराणहून 201 जण मायदेशी परतले.
गेल्या बुधवारी ईराणच्या तेहरानमधून 201 हिंदुस्थानींना बुधवारी विशेष विमानातून हिंदुस्थानात आणले. आतापर्यंत 509 हिंदुस्थानींन परत आणले आहे. सर्व हिंदुस्थानींना राजस्थानच्या जैसलमेरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
हिंदुस्थानात 151 कोरोनाचे रुग्ण
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थानात आतापर्यंत कोरोनाचे 151 रुग्ण आढळले आहेत. बेंगळूरूत कोरोनाचे दोन नवीव रुग्ण आढळले आहेत. तर देशात आतापर्यंत तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 13 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
चीनमधून डोके वर काढलेल्या कोरोना विषाणूने एक-एक करीत जगभरात हातपाय पसरले आहेत. कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असून गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाची 14 हजार लोकांना लागण झाली. त्यामुळे जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख 75 हजार 536 वर पोहोचली आहे. याचवेळी जगभरातील बळींचा आकडा सात हजारांवर गेला आहे.
कोरोनाने मंगळवारी महाराष्ट्रात पहिला बळी घेतला. 5 मार्च रोजी दुबईहून परतलेल्या घाटकोपर येथील 64 वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. घाटकोपर येथील 64 वर्षीय वृद्ध व्यक्ती 5 मार्च रोजी दुबईहून परतला होता. 8 मार्च रोजी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयात संबंधित रुग्णाला कोरोना झाल्याचे आढळल्यानंतर तत्काळ कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्याच्या संपर्कात आलेल्या 82 कर्मचाऱयांनाही वेगळे राहण्यास सांगण्यात आले होते. या रुग्णाची पत्नी तसेच मुलालाही कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
























































