
खोटी माहिती देऊन लपूनछपून कोटय़वधी रुपये किमतीच्या मोराच्या पिसांची तस्करी करणाऱयांचा डाव डीआरआयने न्हावा-शेवा बंदरात हाणून पाडला. न्हावा- शेवा बंदरातून ही मोरांची पिसे गुपचूप चीनला नेण्यात येणार होती. पण डीआरआयने वेळीच कारवाई करीत दोन कोटी रुपये किमतीची 28 लाख मोराची पिसे हस्तगत केली. याप्रकरणी अटकेची कारवाईदेखील केली.
न्हावा-शेवा बंदरातून खोटी माहिती देऊन त्याआधारे मोराच्या पिसांची चीनला तस्करी केली जात असल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने बंदरात चीनला पाठविण्यासाठी आणलेल्या मुद्देमालाची तपासणी केली असता त्यात मोराची पिसे व पिसाच्या कांडय़ा असा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी याची निर्यात करणाऱयास डीआरआयने अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. जप्त केलेल्यामध्ये मोराची 28 लाख पिसे आणि 16 हजार पिसांच्या कांडय़ांचा समावेश आहे.



























































