
बिहारमध्ये ऐन दिवाळीत विषारी दारुमुळे मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. गोपालगंज आणि पश्चिमी चंपारण जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात विषारी दारु पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 31 वर पोहोचली आहे. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया गावात दिवाळीच्याच दिवशी 12 जणांचा मृत्यू झाला, तर गोपालगंजमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तसेच यामुळे अनेक जणांची दृष्टीही गेली आहे. गेल्या आठवड्यात मुझफ्फरपूरमध्येही 8 जणांचा मृत्यू झाला होता.
गेल्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये विषारी दारु पिऊन मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. ऐन दिवाळीत पश्चिम चंपारण आणि गोपालगंजमध्ये 23 जणांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. लोकांचे सांत्वन करण्यासाठी बिहारचे मंत्री जनक राम यांनी गोपालगंजचा दौरा केला. यावेळी त्यांनी हे एनडीए सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला.
गुरुवारपर्यंत मृतांचा आकडा 21 होता. मात्र शुक्रवारी सकाळीही बेतिया गावातील अन्य दोघांची प्राणज्योत मालवली. या दोघांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे कळालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यावर सर्व स्पष्ट होईल, असे मंत्री सुनिल कुमार यांनी सांगितले.
Bihar | 21 people including 10 people in Bettiah and 11 people in Gopalganj have died due to consumption of illegal liquor: State minister Sunil Kumar
— ANI (@ANI) November 5, 2021
70 लोकांनी गमावला जीव
जानेवारी 2021 पासून बिहारमध्ये विषारी दारु प्यायल्याने 70 लोकांचा जीव गेला आहे. नवादा, पश्चिम चंपारण, मुझफ्फरपूर, सीवान आणि रोहतास जिल्ह्यात हे सर्व मृत्यू झाले आहेत. तसेच अनेक लोकांचे डोळेही गेले आहेत.
2016 पासून बंदी
दरम्यान, बिहारमध्ये 5 एप्रिल 2016 पासून दारु बनवणे, व्यापार करणे, साठवण करणे, वाहतूक करणए आणि पिण्यावर बंदी आहे. मात्र तरीही लोक अवैधरित्या दारु बनवतात आणि पितात. त्यामुळे आतापर्यंत अनेक लोकांनी जीव गमावला आहे.
























































