३१ दिवस, तडका नसलेला मसालेदार चिवडा

>>वैष्णवी कानविंदेपिंगे

सिनेमा म्हटलं म्हणजे सगळय़ात आधी त्यात भरघोस करमणूक पाहिजे, त्यात चरचरीत नाटय़ पाहिजे, ग्लॅमर पाहिजे, काळीज पिळवटणारी कथा पाहिजे. प्रेम, दुःख, राग, त्याग इत्यादी मूलभूत भावनांचा कल्लोळ, दंद्व, विरह, आयटम अशी बहुरंगी गाणी, नवे, तरुण, टवटवीत, देखणे चेहरे असं सगळं पाहिजे. नाही म्हणायला हिंदीतला एखादा चेहरा मराठीत आला पाहिजे. आता एवढं सगळं खच्चून भरलं म्हणजे सिनेमा सुपरहिटच असायला पाहिजे नाही का? पण होतं असं, छान छान वाटणाऱ्या अशा असंख्य गोष्टी एकाच पोत्यात दाबून भरल्या की, त्यातल्या कुठल्याही गोष्टीचा मनापासून आस्वाद घेताच येत नाही. एवढंच नाही तर हाताला लागतील त्या सगळय़ा गोष्टी कोंबून कोंबून भरल्यामुळे ते पोतं नको तेवढं जड होतं आणि तो भार नकोसा वाटायला लागतो.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘३१ दिवस’ हा सिनेमा पाहताना अशीच काहीशी भावना होते. खरं तर या सिनेमाच्या कथेत प्रचंड नाटय़ आहे, पण झालंय असं की, ते नाटय़च इतकं रंगतदार असताना त्या नाटय़ाला आणखी फिल्मीपणाच्या रंगात मढवल्यामुळे ते बेगडी झालंय आणि त्यामुळे त्याची मूळ रंगत रंगूच शकली नाही. दिग्दर्शक व्हायच्या वेडाने झपाटलेल्या एका तरुणाची ही कथा. तो प्रेमात पडतो, लग्न करतो. प्रयत्नांती दिग्दर्शक म्हणून करीअरची कासही धरायला लागतो. सगळं छान, मनासारखं सुरू असताना अचानक त्याच्या आयुष्यात एक विपरीत घटना घडते आणि आयुष्याची स्वप्नं पत्याच्या बंगल्यासारखी कोसळतात. त्या संकटामुळे दिग्दर्शक व्हायच्या स्वप्नामध्ये आडकाठी येते, पण तरीही तो त्यावर कडी करायचं ध्येय मनात धरतो. मग त्याचं स्वप्न पूर्ण होतं का, असं काय संकट येतं आणि त्यावर मात करण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं या सगळय़ाची उत्तरं हा सिनेमा पाहताना मिळतात.

या सिनेमामध्ये नाटय़ तर आहेच, पण नाटय़ रंगणं आणि ते नाटकी होणं या दोन्हीमध्ये एक बारीक रेष असते, त्या रेषेचं भान दिग्दर्शकाने ठेवलं पाहिजे होतं. अर्थात या सिनेमातून तेवढय़ापुरती करमणूक वाटय़ाला येते नाही असं नाही, पण होतं असं की, अशा पद्धतीच्या सिनेमांमध्ये अनपेक्षित धक्के गरजेचे होतात. आता अमुक एक घडणार असं प्रेक्षकाला वाटत असताना त्या गोष्टीला फाटा देत वेगळं काहीतरी समोर येतं, अचंबित व्हायला होतं तेव्हा तो सिनेमा खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. संकल्पना जरी चांगली असली तरी त्या संकल्पनेवर बांधलेली वेगळी कथा किंवा ती मांडताना वापरलेली वेगळी पद्धत सिनेमाला उंचीवर येते. आयटम साँग, इमोशनल संवाद, भव्य दृष्यं या गोष्टी नंतर येतात. गरज असते ती लेखक, दिग्दर्शकाच्या कल्पकतेची, पण दुर्दैवाने या सिनेमात त्याचाच अभाव दिसतो. या सिनेमात सुरुवातीपासूनच पुढचं दृष्य काय असेल ते प्रेक्षकाला छातीठोकपणे सांगता येऊ शकतं आणि तसंच घडतंदेखील. उदा. वडील आणि मुलामधल्या भावनिक प्रसंगानंतर आता काहीतरी वाईट घडणार हे स्पष्ट कळतं. सुरुवातीला अंधशाळेचं वातावरण आणि नंतर हीरोचा अपघात यामुळे नंतरचा अर्धा भाग काय असणार हे आधीच कळतं किंवा क्लायमॅक्समध्ये जे नाटय़ घडतं त्यात हीरो-हिरॉईन काय करणार ते चुटकीसरशी सांगता येतं. नाटय़मय वाटणाऱ्या प्रत्येक प्रसंगात असंच घडतं. त्यामुळे सिनेमातला खुसखुशीतपणा निघून जातो आणि बरेच दिवस ठेवलेल्या चिवडय़ासारखा सिनेमा शिळा वाटायला लागतो.

शशांक केतकर चॉकलेट हीरो म्हणून शोभून दिसतो. त्याचं कामही तसं हीरोला साजेसंच आहे. हिरॉईन म्हणून मयुरी देशमुख दिसायला देखणी आहे, पण सहज अभिनयाच्या बाबतीत मात्र तिची गाडी ठिकठिकाणी कच खाते. रिना अगरवाल या अभिनेत्रीच्या वाटय़ाला फारसं काम नाही, पण तिने अंधत्व मात्र चांगलं सादर केलंय. बाकी इतर कलाकारांचं असणं हे फक्त तोंडलावणीपुरतं आहे. विशेष उल्लेख करावा असं कोणीही नाही.

या सिनेमाचं शीर्षक ‘३१ दिवस’ आहे, पण मुळात जे ३१ दिवस चॅलेंज असतं ते फार उशिरा घडतं. मध्यांतरानंतर काही काळाने हा सिनेमा आता कधी संपेल असा विचार मनात डोकवायला सुरुवात होतो तेव्हाच ३१ दिवसांचं चॅलेंज सुरू होतं. आधीच्या असंख्य प्रस्तावना वगळून जर ते आधीच आलं असतं आणि ते चॅलेंज अधिक खुलवलं असतं तरीही सिनेमामध्ये जान येऊ शकली असती, पण दुर्दैवाने ते शेवटाकडे थोडक्यात गुंडाळल्यासारखं झालंय. स्टंट सीन्स चांगले झाले आहेत, पण तेदेखील पाहताना त्यात काय घडणार हे स्पष्ट समोर येतं आणि त्यातली गंमत निघून जाते. नाही म्हणायला संवाद चांगले लिहिले गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यात अनावश्यक तात्त्विकतेचा मारा होतो, पण तरीही ती बाजू बरी सावरली गेली आहे. सिनेमा शूट करताना आयटम साँग घालणंदेखील चांगलं जुळून आलंय, पण सुरुवातीला मध्यमवर्गीय मराठमोळय़ा घरातल्या लग्नकार्यात धिनच्यॅक आयटम साँग जागा चुकल्यासारखं वाटतं. बाकी कॉलेजमधले नाटकाच्या ग्र्रुपमधले हलके फुलके प्रसंग वगैरे ठीक.

एकूणच ‘३१ दिवस’ हा सिनेमा मसालेदार आहे, पण हा मसाला हवा तसा कुटला गेला नसल्याने अपेक्षित स्वाद मात्र येतच नाही. या सिनेमातून थोडीबहुत करमणूक होत असली तरी या सिनेमाचे कलाकार मराठी प्रेक्षकाला परिचित आहेत. शीर्षकात वेगळेपणा आहे. त्यामुळे सिनेमा काहीतरी वेगळं देईल ही अपेक्षा मात्र दुर्दैवाने फोल ठरते.

> दर्जा       :  **

> सिनेमा :       ३१ दिवस

> निर्माता   :    भरतान सुरेश बाबू

> दिग्दर्शक       :   आशीष भेलकर

> कथा/संवाद    :   उमेश जंगम

> पटकथा   : उमेश जंगम, आशीष भेलकर

> संगीत    : चिनार-महेश

> कलाकार : शशांक केतकर, मयुरी देशमुख, रिना अगरवाल, राजू खेर,

                  आशा शेलार, हीना पांचाळ,

                  विवेक लागू, सुहिता थत्ते,

                  अरुण भडसावळे, नितीन जाधव, जिना मिरानी