
आडगावच्या नववा मैल परिसरात शनिवारी दुपारी पोलिसांनी पाठलाग करून स्विफ्ट कार अडवून चार लाख 80 हजार रुपये किंमतीचा 32 किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील नववा मैल परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणी सुरू आहे. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास तपासणी सुरू असताना धुळ्याहून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात स्विफ्ट कार निघून गेली. आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, संजय बिडगर आदींच्या पथकाने पाठलाग करून कार अडविली असता झडतीत 32 किलो साडेतीनशे ग्रॅम गांजा आढळला.
कारमधील धुळे जिह्यातील दहिवत येथील बिसन रवी पावरा (21), कमलसिंग सिताराम पावरा (22), शिरपूरचा भूषण प्रकाश भोई (34), राजेश शूरपाल पावरा (19) व जामनी पाडा येथील विकास मोतीराम पावरा (20) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून मोबाईल, रोकड, कार व गांजा असा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक शेख यांच्या फिर्यादीवरून वरील पाचजणांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































