मुंबईत 33 जणांना स्वाइन फ्लू; राज्यात दीड महिन्यात 17 बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यभरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले असताना आता मुंबईतही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळू लागले आहेत. मुंबईत आतापर्यंत 33 रुण आढळले आहेत तर राज्यभरात 145 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत मुंबई वगळता राज्यभरात स्वाइन फ्लूमुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक सात मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत.

राज्यात यंदा थंडीचा चांगलाच कडाका होता. थंड वातावरणामुळे स्वाइन फ्लूचे विषाणू अधिक सक्रिय झाले आहेत. स्वाइन फ्लूवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर आरोग्य विभागाकडून केला जात आहे. मात्र हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रार्दुभाव वाढला असून गेल्या दीड महिन्यात 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी 23 जानेवारीपर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंत आणखी 9 जणांचा बळी गेला. मृत्यूंमध्ये सर्वाधिक नागपूरचे आहेत. नागपूर सर्कलमध्ये 97 जणांना लागण झाली होती. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमध्ये 3 जण दगावले आहेत. नाशिकमध्ये 42 जणांना लागण झालेल्यांपैकी 4 व्यक्तींचा बळी गेला आहे. पुणे जिह्यात स्वाइन फ्लूच्या 51 रुग्णांपैकी 3 तिघांचा मृत्यू झाला असून अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. विशेष म्हणजे मुंबईत स्वाइन फ्लूचे 33 रुग्ण असून एकही रुग्ण दगावलेला नाही. ठाण्यामध्ये 43 जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली आहे.

3 लाख 50 हजार रुग्णांची तपासणी
स्वाइन फ्लूचा आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाद्वारे सतर्कता बाळगली जात असून प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या रुग्णात स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे आयसीयू व व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जानेवारी ते आतापर्यंत या काळात सुमारे 3 लाख 50 हजार रुग्ण तपासण्यात आले आहे. त्यापैकी चार हजार रुग्णांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या असून या गोळय़ांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील बहुतांश भागांत या कालावधीत ग्रामीण भागात यात्रा, जत्रा आणि उत्सकांचे आयोजन केले जाते. अशा ठिकाणी स्वाइन फ्लूसंदर्भात जनजागृती करण्याकरिता मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री पुढे म्हणाले.