
शिकारीच्या उद्देशाने गैरकायदा, बिगरपरवाना दोन बंदुका व काडतुसे बाळगल्याप्रकरणी कुडाळ येथील चौघांवर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चौघेही शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन फिरत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या पथकाने रविवारी पहाटे 5.45वा. कडावल बाजारपेठ येथे त्यांना ताब्यात घेतले. यात दोन शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
त्यांच्याकडून 1 कार, 1 मोटारसायकल, 2 काडतूस बंदूका, 13 जिवंत काडतूसे व इतर साहित्य असे मिळून एकूण 6 लाख 14 हजार 50 रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैद्य अग्नीशस्त्रांचा वापर करून प्राण्यांची शिकार करून त्याच्या अवयवांची विक्री व तस्करी करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन करीत होते.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर पाळत ठेवून कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. यानुसार, रविवार दि. 23. एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांना पांग्रड जंगलात कुडाळ येथील काही इसम कार व मोटारसायकलने जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी गेले असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहा.पोलीस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, पोलीस अंमलदार प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी कडावल बाजारपेठेत सापळा रचला व सकाळी 5.45वा.चे मानाने पांग्रडवरून कुडाळकडे जाणारी एक सफेद कार व एक मोटारसायकल थांबवून तपासणी केली.
त्यामधील चार इसमांच्या ताब्यातून दोन काडतूस बंदूका व 13 जिवंत काडतूसे त्यांच्याकडून हस्तगत केली. कारमधील दोन इसम व मोटारसायकलवरील इसम, असे एकूण 4 इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कार, एक मोटार सायकल, दोन काडतूस बंदूका (ज्यामध्ये 1 डबल बॅरल बंदूक व 1 सिंगल बॅरल बंदूक), 13 जिवंत काडतूसे व इतर साहित्य, असे मिळून एकूण 6 लाख 14 हजार 50 रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या इसमांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25 सह कलम 37(1), 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत करण्यात येत आहे. याप्रकरणी संशयित चौघांनाही नोटिसा बजावणी करून सोडण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. दरम्यान या अनुषंगाने अवैद्य शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती असल्यास त्याबाबत पोलिसांना कळविण्यात यावे, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलीस दलामार्फत करण्यात आले आहे.
























































