बेफाम वाहनधारकांचे मरण रस्त्यावर! रस्ते अपघातात राज्यात दररोज जातायत 40 बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाऱ्याच्या वेगाने बेफाम गाड्या चालवणाऱ्या वाहनधारकांचे मरण रस्त्यावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या वाहनचालकांना वेगाची नशा चढली असून गल्लीबोळात असो की महामार्गावर, सर्वत्र गाडय़ा सुसाट धावताना दिसतात. त्यामुळे राज्यातील अपघातांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी त्यामध्ये दररोज 40 हून अधिक लोकांचे बळी जात आहेत. हे वाढते बळी रोखण्याचे आव्हान परिवहन विभागासमोर आहे.

राज्यात दिवसाला 40 हजाराहून अधिक नवीन वाहनांची भर पडत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. जानेवारी महिन्यात राज्यात 2156 अपघात झाले असून त्यामध्ये 1 हजार 51 जणांचा बळी गेला आहे, फेब्रुवारी महिन्यात 2250 अपघातांमध्ये 1229 जणांना प्राण गमवावा लागला आहे, तर मार्च महिन्यात 2333 अपघातांमध्ये 1268 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण सध्या 13 टक्क्यांनी घटले आहे. मात्र अपघातामध्ये दररोज बळी जाणाऱयांची संख्या चिंताजनक असल्याची माहिती परिवहन विभागाच्या एका अधिकाऱयाने दिली.

रस्ता सुरक्षेसाठी जिल्हा स्तरावर ऍक्शन प्लान
राज्यातील अपघातांची संख्या मोठी असून त्यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने जिल्हास्तरापर्यंत ऍक्शन प्लान तयार केला आहे. तसेच अपघात कशामुळे होत आहेत, अपघाताचे ब्लॅकस्पॉट कोणते याचा शोध घेऊन तेथे भविष्यात अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना सुरू केल्याचे अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी सांगितले.