
सामना ऑनलाईन | मुंबई
पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, गाडय़ांची देखभाल, गॅरेजचा खर्च आणि प्रदूषण यावर मात करीत राज्य सरकारच्या सेवेत पाच इलेक्ट्रिक व्हेईकल म्हणजे विजेवर धावणाऱ्या पाच मोटारी दाखल झाल्या आहेत. मोबाईलप्रमाणे मोटारीची बॅटरी चार्ज केल्यावर आणि एका चार्जिंगमध्ये तब्बल 100 किमीवर धावणारी विजेवरची मोटार सध्या मंत्रालयात चर्चेचा विषय आहे. विजेवर धावणाऱ्या एका मोटारीमुळे दर महिन्याला दहा हजार रुपयांची इंधनाची बचत होत आहे. मागील तीन महिन्यांत या पाच मोटारींनी देखभालीसाठी गॅरेजचे तोंड देखील पाहिले नाही. पुढील तीन महिन्यांत राज्याच्या सेवेत चौदा इलेक्ट्रिक व्हेईकल येणार आहेत. सरकारी सेवेत विजेवरील मोटारी दाखल करून घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य सरकार ठरले आहे.
इंधनात बचत व प्रदूषणावर मात करण्यासासाठी राज्य सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. त्याअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्र सरकारच्याच एनर्जी ईफीशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड(ईईएसएल) या कंपनीकडून दर महिना 25 हजार रुपये एक अशा दराने विजेवरील पाच मोटारी भाडय़ाने घेतल्या आहेत. त्यासाठी मंत्रालयात चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. या खात्याचे सचिव अजित सगणे व अन्य चार अधिकारी मागील तीन महिन्यांपासून विजेवरची मोटर वापरत आहेत. या मोटारीबाबत पुढील तीन महिन्यांत वित्त विभागाला अहवाल सादर होईल. अहवाल समाधानकारक असल्यास अजून चौदा मोटारी सरकारी सेवेत दाखल होतील. देशात दोन खासगी कंपन्या या मोटारींचे उत्पादन करीत असून एका मोटारीची किंमत सुमारे आठ ते नऊ लाख रुपये आहे. पण अजून मुंबईत सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे खासगी गाडय़ा रस्त्यावर नाहीत. नजीकच्या काळात विजेवरच्या मोटारी रस्त्यावर येतील. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महावितरणने टेंडर मागवले आहेत.
चार्जिंगचा दर
महाराष्ट्र वीज नियमाक आयोगाने (एमईआरसी) सार्वजनिक ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसाठी 6 रुपये प्रती युनिट हा दर निश्चित केला आहे. रात्री दहा ते पहाटे सहा यावेळेत मोटार चार्ज केली तर साडेचार रुपये दर निश्चित केला आहे.
स्वस्त आणि मस्त मोटारी
राज्याच्या बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे म्हणाले, मागील तीन महिन्यांपासून विजेवरची मोटार वापरत आहे. अतिशय समाधानकारकरीत्या धावत आहे. त्यामुळे इंधनाच्या खर्चात प्रचंड बचत होते. एकदाही मोटार बिघडलेली नाही.
मुंबई-पुण्यात 50 चार्जिंग स्टेशन
ईलेक्ट्रिक मोटारींच्या खरेदींना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोत्साहन धोरण 2017 जाहीर केले आहे. खासगी मोटारी रस्त्यावर आल्यावर राज्यात 50 चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी महावितरणला नोडल एजन्सी म्हणून नेमले आहे. त्यासाठी नवी मुंबई, ठाणे, वाशी, पनवेल, पुणे, नाशिक, नागपूर तसेच मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी टेंडर मागवण्यात आली असून तीन कंपन्यांनी टेंडर सादर केली आहेत.
विजेवर धावणाऱ्या मोटारीचे वैशिष्टय़
मोबाईलप्रमाणे मोटारीची बॅटरी चार्ज करायची
एका चार्जिंगमध्ये गाडी 100 किमी धावते
चार्जिंगला कालावधी सुमारे एक तास
शून्य देखभाल-प्रदूषण शून्य
महागडय़ा इंधनात बचत
इंजिनाच्या जागेवर बॅटरी



























































