
उपनगरात वीज वितरण करणाऱया अदानी इलेक्ट्रिसिटीने तब्बल 50 लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश केला आहे. मालाड पश्चिम येथील अल्ताफ शेख आणि सय्यद इम्रान यांचे वर्टिकल माऊंटिंगचे इंडस्ट्रियल युनिट आहे. त्यांना अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज पुरवठा केला जात आहे. त्यांचा विजेचा वापर आणि वीज देयकावरील वीज वापराची आकडेवारी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार अदानी इलेक्ट्रिसिटीने संपूर्ण फीडरवरील वीज वापराचे निरीक्षण केल्यानंतर वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले. त्याआधारे दक्षता पथकाने धाडी टाकत वीजचोरी पकडली.
दोन वर्षांत अल्ताफ शेख आणि सय्यद इम्रानने आपल्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये 28.44 लाख रुपयांच्या विजेची चोरी केल्याचे समोर आले आहे. दुसऱया एका वीजचोरी प्रकरणात कांदिवली पश्चिमच्या चारकोप गांधी नगर येथे हमीद उल्ला शेख यांच्याकडून चालवल्या जाणाऱया इलेक्ट्रो प्लेटिंग युनिटमध्ये विजेची चोरी आढळली आहे. या ठिकाणी 21 लाख 75 हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळल्याचे अदानी इलेक्ट्रिसिटीने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






























































