
प्लॉटिंग व्यावसायिकाकडे तब्बल 50 लाख रुपये खंडणी मागितल्याची घटना 10 जानेवारीला घडली आहे. आरोपीने व्यावसायिकाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी खंडणीची मागणी करत तडजोडीअंती 4 लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोनु आण्णा सोनवणे (रा. लक्ष्मी कॉलनी, जुना कॅनॉलजवळ, हडपसर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रमेश नंदकुमार दंडाले (40, रा. शेवाळेवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश दंडाले यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय असून आरोपी सोनू सोनवणे याने त्यांच्या विरुद्ध तहसिलदारांकडे तक्रार अर्ज केला होता. त्याशिवाय रमेश यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, असा तक्रार अर्ज आकुर्डी पोलीस ठाण्यात केला होता. त्यावेळी रमेश हे संबंधित पोलीस ठाण्यातून बाहेर येत असताना आरोपी सोनवणेने त्यांना अडविले. प्रकरण मिटवायचे असेल, तर 50 लाख रुपये मागितले. तडजोडीअंती त्याने 4 लाखांची खंडणी मागितल्याचे दंडाले यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलीस घेणार शोध
फिर्यादी रमेश यांनी एक प्लॉट नवनाथ कादमाने यांना विक्री केला होता. त्यात अनधिकृतपणे पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचा संशयातून ते पीएमआरडीए कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यापूर्वी आरोपी सोनु सोनवणे याने तक्रार दिल्याचे समजले. तेथेही आरोपी सोनवणे कशासाठी गेला होता, याचा पोलीस शोध घेत आहे.



























































