मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मतदारसंख्येत 12.67 टक्क्यांनी वाढ, मालाड आणि कुर्ल्यात 50 टक्क्यांनी वाढले मतदार

प्रातिनिधिक फोटो

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या मतदारांच्या मसुदा यादीनं शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल दाखवला आहे. मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये मतदारसंख्येत एकूण 12.67 टक्क्यांनी वाढ नोंदली गेली आहे मात्र ही वाढ सर्व भागांमध्ये समान नाही. विशेषत: पश्चिम उपनगर आणि मध्यवर्ती भागात मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तर दक्षिण मुंबईतील अनेक जुन्या प्रभागांत मतदारसंख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, 2017 नंतर मुंबईतील एकूण मतदारसंख्येत 12.67 टक्के वाढ झाली असली तरी प्रत्येक प्रभागात बदलाचा वेग वेगळा आहे. सर्वाधिक वाढ मलाड–मालवणी आणि कुर्ला परिसरात दिसून आली असून पी–नॉर्थ विभागातील वार्ड क्रमांक 48, 33, 163 आणि 157 येथे मतदारसंख्येत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या भागांत कामगार वर्ग आणि अल्पसंख्याक जनसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या वाढीकडे राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा विशेष लक्ष ठेवून आहे. उल्लेखनीय म्हणजे वाढीच्या टॉप पाच प्रभागांपैकी तीन प्रभाग या एका विभागातून आहेत.

दुसरीकडे, दक्षिण मुंबईतील आयलंड सिटी भागातील अनेक जुने प्रभाग ओस पडत असल्याचे या यादीतून स्पष्ट झालं आहे. शहरातील एकूण 24 प्रभागांमध्ये मतदारसंख्या कमी झाली असून त्यापैकी दहा प्रभाग उपनगरांत आहेत. मात्र सर्वाधिक घट दक्षिण मुंबईच्या भागांत आढळली आहे. सी वॉर्डमधील कळबादेवी आणि चीरा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने मतदार कमी झाले आहेत. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासामुळे रहिवाशांना मुंबईबाहेर घरे मिळाली आणि त्यामुळे लोकसंख्या हलली असल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

या बदलामागे मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेचा मोठा वाटा आहे. बीएमसी आणि निवडणूक विभागाने मिळून सुमारे 11 लाख डुप्लिकेट नावं काढून टाकली, ज्यामुळे अनेक भागांत आकडे अचानक कमी झाले. यासोबतच नवीन मतदारांची नोंदणी, आंतरिक स्थलांतर आणि नव्या गृहप्रकल्पांमुळे मतदारसंख्येची भूगोल बदलल्याचे सूचित होत आहे.

या बदलांचा आगामी बीएमसी निवडणुकांतील प्रभागनिहाय राजकीय स्पर्धेवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. मसुदा यादीनंतर हरकती आणि सुधारणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.