
52 व्या ‘इफ्फी’ अर्थात इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला पणजीत शनिवारी शानदार सुरुवात झाली. फेस्टिव्हलमध्ये 73 देशांतल्या 148 आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह 300 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. उद्घाटनाचा दिवस कलाकारांचे स्टेज शो आणि महत्त्वाच्या पुरस्कार वितरणाने रंगला. कलाकारांना बघण्यासाठी प्रेक्षकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 28 नोव्हेंबरपर्यंत हा सोहळा रंगणार आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत 52 व्या इफ्फी सोहळ्याचे उद्घाटन झाले. आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मार्टिन स्कॉरसेझी आणि इस्तेवान साबो यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षी इफ्फीमध्ये काही अनोख्या उपक्रमांची भर पडली आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. इफ्फीबरोबर प्रथमच ब्रीक्स चित्रपट महोत्सवाद्वारे 5 ब्रीक्स राष्ट्रे त्यांचे चित्रपट प्रदर्शित करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिवंगत डॉ. मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पर्रीकर मुख्यमंत्री असताना पहिल्यांदाच इफ्फीचे यजमानपद गोव्याला मिळाले होते. त्यानंतर सलग 17 वर्षे इफ्फी या समुद्रकिनारी असलेल्या पणजी शहरात साजरा होतो आहे असे सावंत म्हणाले.
n इफ्फीच्या इतिहासात प्रथमच ‘नेटफ्लिक्स’, ‘ऍमेझॉन प्राइम’, ‘झी 5’, ‘व्हूट’ ‘सोनी लाइव्ह’, ‘व्हायकॉम’ हे प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म यात सहभागी होत आहेत. ओटीटीवर चित्रपट पाहण्याचा कल वाढत असताना इफ्फी नवीन तंत्रज्ञान स्वीकारत आहे. तसेच ओटीटी कंपन्यांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
n देशातील तरुण सर्जनशील मनं आणि नवोदित कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्पर्धा घेण्यात आली.
n पणजीतील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या या भव्य उद्घाटन सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या संपूर्ण रंगारंग सोहळ्याचे सूत्रसंचालन चित्रपट निर्माता करण जोहर आणि सूत्रसंचालक अभिनेता मनीष पॉल यांनी केले. अभिनेता सलमान खान आणि रणवीर सिंग यांच्यासह चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार या भव्य सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी स्टेज गाजवून सोडला. सिद्धार्थ आनंद, मधुर भांडारकर, समंथा रुथ प्रभू, मनोज बाजपेयी, खुशबू सुंदर, रवी कोट्टारकारा, राज निदिमोरू, कृष्णा डीके आदी कलाकार आणि दिग्दर्शकांची उपस्थिती होती.
सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी 2021’ हा पुरस्कार अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान केला. प्रसिद्ध गीतकार आणि सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी हे या पुरस्काराचे दुसरे मानकरी असून त्यांना इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी सन्मानित करण्यात येईल.




























































