विजेच्या संकटावर मात करण्यासाठी 577 मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Electric bill centres

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला होत असलेला कोळशाचा अपुरा पुरवठा व त्यातून निर्माण झालेले विजेचे संकट यावर मात करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी तब्बल 577 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी 522 कोटी 47 लाख रुपये खर्च करून हा पूर्ण करण्यात येणार आहे.

राज्यात 7 हजार 500 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याची योजना आहे. यापैकी 2 हजार 500 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प राज्याच्या महानिर्मिती कंपनीकडून सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. तर उर्वरीत 5 हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जेचे वीज निर्मिती प्रकल्प इतर विकासकांकडून विकसित करण्याची योजना आहे.

राज्यात महानिर्मितीमार्फत आतापर्यंत चंद्रपूरमध्ये 5 मेगावॅट, धुळे जिह्यातल्या साक्रीमध्ये 125 मेगावॅट तसेच शिर्सुफळ बारामती येथे 50 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत, तर आता धारशीव जिह्यातील कौडगावमध्ये 50 मेगावॅट क्षमतेचा त्याचबरोबर लातूर जिह्यात सिंदाळा येथे 60 मेगावॅट क्षमतेचा, महानिर्मितीच्या विद्युत केंद्राकडे असलेल्या जागेवर एकूण 52 मेगावॅट क्षमतेचे आणि साक्रीतील शिवाजी नगरमध्ये 25 मेगावॅट क्षमतेचे असे एकूण 187 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या उद्योग, ऊर्जा विभागाने जारी केला आहे. महानिर्मिती कंपनीमार्फत ईपीसी म्हणजे ‘इंजिनीयरिंग प्रोक्युरमेंट अँड कंस्ट्रक्शन’ तत्त्वावर हे 187 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यासाठी भागभांडवल स्वरुपात सुमारे 158 कोटी 29 लाख रुपये महानिर्मिती कंपनीकडून त्यांच्या अंतर्गत स्रोतांतून किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जाद्वारे उभारून प्रकल्पाचे काम करण्यास उद्योग-ऊर्जा विभागाने मान्यता दिली आहे.

वाशीम, चंद्रपूर, यवतमाळमध्ये 390 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे प्रकल्पही महानिर्मिती कंपनीमार्फत ‘ईपीसी’ तत्त्वावर उभारण्यात येतील. त्यासाठी 364 कोटी 18 लाख रुपये महानिर्मिती कंपनीकडून त्यांच्या अंतर्गत स्रोतातून किंवा वित्तीय संस्थांकडून उभारले जातील.

औष्णिक वीज निर्मितीऐवजी सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज निर्मिती केल्यास कोळशापासून होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. राज्यातील विविध 46 ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून मे 2022पर्यंत काम पूर्ण होईल.
– डॉ. नितीन राऊत, ऊर्जा मंत्री