बीडला धक्का; जिल्हा कारागृहातील 59 कैदी कोरोनाबाधित आढळले

बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, आता जिल्हा कारागृहातच कोरोनाने प्रवेश केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बीड जिल्हा कारागृहातील 59 कैदी कोरोनाबाधित असल्याचे तपासणीवरून निष्पन्न झाले आहे. त्यांच्या संपर्कात आलेले पोलीस, कारागृहातील कर्मचारी व अधिकारी या सर्वांचीच आता कोरोना चाचणी करावी लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कैदी कोरोनाबाधित आढळल्यामुळे पोलीस प्रशासनही हादरले आहे. बीड जिल्ह्यात पाच महिन्यातील कोरोनाचा हा मोठा उद्रेक आहे.

बीड जिल्ह्यात रविवारी नव्याने तब्बल 128 रूग्ण आढळले आहे. त्यात बीड जिल्हा कारागृहातील तब्बल 59 कैद्यांचा समावेश आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक 76 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रविवारी सकाळी जिल्ह्यात एकूण 904 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 128 रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 776 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई शहरातील 8, आष्टीमध्ये 8, बीड 76, धारूर 3, गेवराई 6, केज 4, माजलगाव 2, परळी 17, वडवणी 3 आणि पाटोदा तालुक्यात एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्हा कारागृहात रविवारी एकाच दिवशी तब्बल 59 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. हे सर्व कोरोनाबाधित पूर्वीच्या रुग्णांचे सहवासीत आहेत. या रुग्णांमुळे बीडमधील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3954 झाली असून यापैकी 2051 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 99 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 1804 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या