
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच 1 बी व्हिसासाठी ठरवलेल्या 65 हजारांच्या मर्यादेइतके अर्ज दाखल झाल्याची माहिती अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभागाने दिली आहे. 2020 या वर्षांसाठी हे अर्ज असून हिंदुस्थानी व्यावसायिकांसह इतर देशांच्या नागरिकांनी केलेल्या अर्जांचाही त्यात समावेश आहे.
एच 1 बी व्हिसामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेतील कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते. त्यासाठी त्यांची तांत्रिक निपुणता आणि कौशल्याच्या निकषावर निवड होते. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्या व्हिसामार्फत देशात येणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहेत. अमेरिकेतील या कंपन्यांमध्ये हिंदुस्थान आणि चीनचे कर्मचारी सर्वाधिक आहेत. एच 1 बी व्हिसासाठी 65 हजारांची मर्यादा असून तेवढे अर्ज दाखल झाले आहेत. 2020 वर्षासाठी मागवण्यात आलेल्या अर्जांची संख्या ठरवलेल्या मर्यादेइतकी झाली असल्याची माहिती अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभागाने दिली आहे.
























































