
बेंगळुरूच्या जेपी नगर भागात मागील आठवड्यात रस्त्याच्या कडेला एका व्यावसायिकाचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता पोलिसांनी या 67 वर्षीय व्यावसायिकाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या 67 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू सेक्स करत असताना एपिलेप्टिक अटॅकमुळे म्हणजेच ब्रेन स्ट्रोकमुळे झाला. मात्र या घटनेनंतर व्यावसायिकाची प्रेयसी आणि तिच्या पतीने त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरून रस्त्यावर फेकून दिला. मृत व्यावसायिकाच्या फोन कॉलच्या आधारे पोलिसांनी हा खुलासा केला आहे.
बंगळुरुतील जेपी नगरमधल्या पुत्तनहळ्ळी भागात बाला सुब्रमण्यन (67 वर्षे) वास्तव्यास होते. आपल्या नातवाला बॅडमिंटन क्लासला सोडण्यासाठी ते घराबाहेर पडले होते. संध्याकाळी त्यांनी त्यांच्या सुनेला आपण घरी उशिरा येणार असल्याचे सांगितले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या मुलाने आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. ते न सापडल्याने सुब्रमण्यम यांच्या मुलाने पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. 17 नोव्हेंबरला बाला सुब्रमण्यम यांचा मृतदेह रसत्याच्या कडेला सापडला होता. त्यांना बेडशीटमध्ये गुंडाळलं होतं आणि डोक्यावर प्लॅस्टीकची गोणी घातली होती. पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली असता त्यांना बाला यांच्या मोलकरणीकडून त्यांच्या मृत्यूचे सत्य कळाले.
बाला यांचे त्यांच्या मोलकरणीसोबत अनैतिक संबंध होते. मोलकरणीच्या घरी कोणी नसलं की बाला तिच्या घरी जायचे. 16 नोव्हेंबर रोजी देखील ते तिच्या घरी गेले होते. यामुळे बाला यांनी त्यांच्या सुनेला आपण उशिरा घरी येणार असल्याचं सांगितलं होतं. मोकरणीने पोलिसांना सांगितलं की सेक्स करत असताना बाला यांना एपिलेप्टिक अटॅक आला आणि त्यांचा जीव गेला.
अवघड अवस्थेत असताना बाला यांचा मृत्यू झाल्याने त्यांची मोलकरीण घाबरली होती. तिने तिच्या नवऱ्याला आणि भावाला घडलेला प्रकार सांगितला. या दोघांनी बाला यांना एका बेडशीटमध्ये गुंडाळलं आणि डोकं प्लॅस्टीकच्या गोणीने झाकलं. यानंतर त्यांनी बाला यांचा मृतदेह निर्जन स्थळी फेकून दिला. बाला यांची गेल्या वर्षी अँजिओप्लास्टी झाली होती. त्यांना इतरही आजार होते. मोलकरणीने केलेला दावा खरा आहे अथवा नाही हे सखोल तपासाअंतीच निष्पन्न होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
























































