
ब्रिजमोहन पाटील । नागपूर
राज्य सरकारच्या शिक्षण खात्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मराठी माध्यमाच्या इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात चक्क सहा पाने गुजरातीमध्ये छापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘भाजप सरकार किती लाचारी करणार?’, असा सवाल करत सरकारने याची माफी मागावी यासाठी विरोधकांनी घोषणाबाजी करून सभागृहाचे कामकाज बंद पाडले.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर राष्ट्रवादीचे आमदार सुनिल तटकरे यांनी आता महाराष्ट्रात गुजरातीचे तुष्टीकरण सुरू झाले आहे असा आरोप करत मराठी माध्यमाच्या सहावीच्या पुस्तकात पान क्रमांक ३९ ते ४५ ही सहा पाने गुजरातीमध्ये छापली आहेत असे सांगितले. यानंतर विरोधी बाकावरच्या आमदारांनी गोंधळ सुरू करत याबद्दल माफी मागण्याची मागणी केली.
पुस्तकाची छपाई गुजरातमध्ये झाली – धनंजय मुंडे
इयत्ता ६ वीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती भाषेत धडे शासनाने प्रसिध्द केल्याची माहिती आमदार सुनिल तटकरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे उपस्थित करुन सरकारने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. सरकारच्या या बेगडी मराठीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान अशी एक लाख पुस्तके छापून वितरित केली गेली असावीत व त्यावर गुजराती मुद्रक असल्याने हे पुस्तक गुजरातमध्ये छापले गेले असावे असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
सरकारने खुलासा करावा – सभापती
दरम्यान, या गंभीर विषयावर जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याबाबत सरकारने खुलासा करावा आणि तात्काळ दुरुस्ती करावी असे निर्देश सरकारला दिले आहेत.

























































