टेन्शन! ओमायक्रोनचे मुंबईत सात पॉझिटिव्ह, एकाही रुग्णाची परदेशवारी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

राज्यात आज एकाच दिवसात आठ ओमायक्रोन रुग्णांचे निदान झाले आहे. यातील सात रुग्ण हे मुंबईतील असून एक रुग्ण वसई-विरारमधील असल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. आज सापडलेले रुग्ण कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेले नसताना त्यांना ओमायक्रोनची लागण झाल्याने कोरोना आता समाजात पसरत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचे निदान झालेल्या आठ रुग्णांमध्ये तीन स्त्रीया व पाच पुरुषांचा समावेश आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात कोरोनाबाधित सापडल्यानंतर त्यांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. हे रुग्ण 24 ते 41 वर्षे वयोगटातील असून यातील तीन जण लक्षणेविरहित तर 5 जणांना सौम्य लक्षणे आढळली आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार असून सहा जणांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापैकी एकाने बंगळुरू तर एकाने दिल्ली प्रवास केला होता. तर मुंबईतील एक व्यक्ती राजस्थानमधील आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.

लसीकरणानंतरही बाधा

आज सापडलेल्या आठ रुग्णांपैकी सात रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. सात रुग्णांना लसीकरणानंतरही ओमायक्रोनची बाधा झाली असली तरी त्यांच्यामध्ये गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत.

 राज्यात एकूण 28 रुग्णांपैकी मुंबईत 12, पिंपरी-चिंचवड 10, पुणे मनपा-2, कल्याण-डोंबिवली-1, नागपूर-1, लातूर-1 आणि वसई-विरारमधील एका रुग्णाचा समावेश आहे. यातील नऊ रुग्णांची  चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर सोडून देण्यात आले. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातील 430 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 21 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षित आहे.

वसईमध्ये एक रुग्ण

नालासोपारा ते मुंबई लोकलने प्रवास करणाऱया एका प्रवाशाला ओमायक्रोनची लागण झाली आहे. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांच्या टेन्शनमध्ये भरच पडली आहे. बाधित रुग्णाला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याला कोणतेही लक्षण नसल्याचे पालिका अधिकाऱयांनी सांगितले.