
नगर जिह्यात आज वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तब्बल सातजणांचा मृत्यू झाला आहे. यात पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील यात्रेहून परतताना कंटेनर आणि कारच्या अपघातात नगर शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. नगर तालुक्यातील सारोळाबद्धी येथे विहीर खोदताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर, नगर-मनमाड महामार्गावर दुचाकीच्या धडकेत सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचराचा मृत्यू झाला आहे. दुचाकी कठडय़ाला धडकून महापालिकेतील कर्मचाऱयाचा मृत्यू झाला आहे. तर, आणखी एका अपघातात उसाच्या ट्रकखाली चिरडून श्रीगोंद्यातील तरुणाचा मृत्यू झाला आहे.
पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भैरवनाथ यात्रेहून नगरकडे परतत असताना नगर-पुणे महामार्गावर चास-कामरगाव घाटात झालेल्या भीषण अपघातात नगर शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार बबन ऊर्फ लक्ष्मण दत्तात्रय गोसके (वय 62, रा.बागरोजा, हडको) व महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश रंगनाथ गोरे (वय 72, रा.बागरोजा, हडको, नगर) यांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेतील वाहनचालक प्रशांत प्रकाश पवार हे गंभीर जखमी झाले आहेत.
वाळवणे येथील भैरवनाथांची यात्रा रविवारी (दि. 17) भरली होती. या यात्रेत हे तीनजण जेवणासाठी वाळवणे येथे गेले होते. तेथून परतत असताना नगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात पुढे जाणाऱया आयशर टेम्पोला त्यांची कार पाठीमागून धडकली. अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही रुग्णवाहिकेतून नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यांतील प्रकाश गोरे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला, तर बबन गोसके यांचा उपचारांदरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.
ढिगारा कोसळून दोन ठार
विहीर खोदण्याचे काम करणाऱया कामगारांच्या अंगावर खडक व मातीचा ढिगारा कोसळून त्याखाली दबून दोनजणांचा मृत्यू झाल्याची घटना नगर-जामखेड रोडवरील सारोळाबद्धी (ता. नगर) शिवारात घडली. प्रल्हाद रोहिदास रक्ताटे (वय 28), विलास शिवाजी वाळके (वय 40) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.
दुचाकीच्या धडकेत परिचर ठार
रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीने जोराची धडक दिल्याने श्रीगणेश विद्याप्रसारकमधील सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर गणपत दामोधर शेलार (वय 62) जखमी झाले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. हा अपघात शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर नगर-मनमाड महामार्गावर झाला.
उसाच्या ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
नगर शहरातील गणपतीमळा येथील रहिवासी असलेला सचिन मच्छिंद्र गाडे हा आपल्या संबंधितांच्या लग्नासाठी दुचाकीवर बेलवंडीमार्गे ढवळगाव येथे जात असताना रस्त्यात उक्कडगाव येथे उसाच्या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाताना समोरून अचानक आलेल्या वाहनाला धडकून सचिन उसाच्या ट्रकखाली सापडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला एकजण सुदैवाने अपघातातून बचावला आहे.
नगर महापालिका कर्मचाऱयाचा मृत्यू
नगर महापालिकेतील कोंडवाडा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी संजय रामभाऊ दळवी (वय 55, रा. पंचवटीनगर, भूषणनगर, केडगाव) यांचा नगर-पुणे महामार्गावरील चास गावच्या शिवारात अपघाती मृत्यू झाला. दळवी हे दुचाकीवरून केडगावहून चासच्या दिशेने जात असताना चास गावच्या जवळ असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठडय़ावर आदळून ते गंभीर जखमी झाले होते. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
























































