
कुर्ला नेहरूनगर येथे पुनर्विकास सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी जमीन खचून महाकाय खड्डा पडल्याने लगतच्या दोन इमारतींना धोका निर्माण झाला. एका इमारतीची पाण्याची टाकी, काही भाग आणि मीटर रूम या खड्डय़ात कोसळला. शिवाय इमारतीचे दोन पाइलही सरकले. त्यामुळे 73 नंबरच्या ‘मेघदूत’ या सात मजली इमारतीमधील 50 आणि 75 नंबरच्या इमारतीमधील 20 कुटुंबे रस्त्यावर आली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने या सर्व 70 कुटुंबीयांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी कसरत करावी लागली.
कुर्ला पूर्व नेहरूनगर येथे राघव बिल्डर्सकडून या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या चार मजली इमारतीच्या कामात तळमजल्यालगत बिल्डरकडून मोठा खड्डा तयार करण्यात आला होता. या खड्डय़ासह इमारतीचा पाया अचानक खचला. याचा फटका लगतच्या क्र. 73 आणि 75 क्रमांकाच्या इमारतींना बसला. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ असलेला जेसीबीदेखील यामध्ये गाडला गेला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लगतच्या दोन्ही इमारतींना धोका निर्माण झाल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. त्यामुळे दोन्ही इमारतींमधील रहिवाशांनी कुटुंबकबिल्यासह इमारतीबाहेर धाव घेतली. तातडीने या इमारती रिकाम्या करण्यात आल्या. दरम्यान, ‘म्हाडा’ आणि पालिका प्रशासनाकडून घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यात आली.
बिल्डरचा बेजबाबदारपणा
संबंधित पुनर्विकास सुरू असलेल्या इमारतीचे काम करणाऱया बिल्डर्सने आवश्यक खबरदारी न घेता बेजबाबदारपणे काम केल्याने ही दुर्घटना घडल्याचे शिवसेनेचे मनीष मोरजकर म्हणाले. त्यामुळे बिल्डरविरोधात नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेना मदतीला धावली
ऐन संध्याकाळच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने तब्बल 70 कुटुंबांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत रहिवाशांना धीर दिला. तसेच या सर्व रहिवाशांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केल्याची माहिती मेघदूत इमारतीत राहणाऱया शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांनी दिली. तर या रहिवाशांची व्यवस्थेसाठी शिवसेनेच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

























































