परभणीत 70 ते 80 हजार मतदारांना मतपत्रिका मिळाल्या नाहीत – खासदार जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

निवडणूक प्रशासनाने जाणीवपूर्वक परभणी शहरात ७० ते ८० हजार लोकांना मतपत्रिकांचे वाटप केले नसल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार तथा खासदार संजय जाधव यांनी केला आहे. रात्री बारा वाजता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन प्रशासनाला याबाबत जाबही विचारला. यावेळी सुमारे २०० शिवसैनिकांसह आलेल्या खासदारांनी हा प्रकार जाणीवपूर्वक केलेला असल्याचा थेट आरोप केला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

या संदर्भात परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी सांगितले की, सर्वच ठिकाणी मतपत्रिकांचे वाटप होऊ शकत नाही. मात्र, परभणी शहरात ८५ टक्के मतपत्रिकांचे वाटप झाले आहे. वाटप न झालेल्या मतपत्रिका बीएलओमार्फत दिल्या गेल्या. शिवाय मतदान केंद्रांवर देखील वाटपासाठी ठेवण्यात आल्या.

दरम्यान, या प्रकरणावरून बुधवारी रात्री १२ वाजता खासदार जाधव यांनी जवळपास २०० शिवसैनिकांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी धाव घेतली. तेथून जिल्हाधिकारी शिवाशंकर यांनी सर्वांना जिल्हा अधिकारी कार्यालयात बोलावून घेतले. या ठिकाणी खासदार जाधव यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारून तात्काळ कारवाईची मागणी केली. सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांना माहिती देताना खासदार संजय जाधव यांनी हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप केला. याच्या मागे कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे, मात्र, सध्या वेळ कमी असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ मतपत्रिका वाटप कराव्यात, अशी भूमिका घेतली.