
आळंदी-पंढरपूर व देहू-पंढरपूर या पालखी मार्गाचे काम अंतीम टप्प्यात आहे. मात्र हा मार्ग वाखरीपासून बायपासमार्गे गुरसाळे, नारायण चिंचोली, मोहोळ, सोलापूरला जोडला आहे. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर या 8.4 कि.मी. रस्त्याचे काम अधांतरी होते. या वाखरी ते विठ्ठल मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी 74 कोटींच्या निधीची घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यामध्ये कायम अडसर ठरणारा सरगम चौकातील रेल्वे पुलामध्येही आवश्यकतेनुसार बदल करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
आळंदी-पंढरपूर व देहू-पंढरपूर या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या तब्बल 12 हजार 294 कोटी रूपये खर्चाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय रस्ते विकास वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पंढरपुरात झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती दर्शविली. तर रस्ते विकास राज्यमंत्री व्ही.के. सिंग, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीचे आज दर्शन घेतले. pic.twitter.com/x08v9OKSYs
— Saamana (@SaamanaOnline) November 8, 2021
गेल्या काही वर्षांपासून आळंदी-पंढरपूर व देहू-पंढरपूर या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुलभ पथदिवे, वृक्षारोपण, सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर, बारामती, बावडा, अकलूज, श्रीपूर, बोरगाव येथे दाट लोकवस्तीच्या ठिकाणी बाह्यवळण घेऊन हा महामार्ग बनविण्यात येत आहे. या बाह्यवळणामुळे वाखरी ते पंढरपूर या 8.4 कि.मी.चा रस्ता वगळण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य पालखी मार्गाचे रूंदीकरण, सुशोभिकरण करण्यात आले असले तरी या मार्गाबाबत मात्र कसलाही आराखडा, निधीची घोषणा अद्यापपर्यंत करण्यात आली नव्हती. त्यामुळे वारकऱ्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये हा मार्ग पालखी मार्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात येत होती. या मार्गासाठी तब्बल 74 कोटी रूपयांच्या सुधारीत निधीची घोषणा गडकरी यांनी केली आहे. त्यामुळे रखडलेला मार्ग आता मार्गी लागणार असून पालखीतील वारकऱ्यांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.
रेल्वे पुलामध्ये आवश्यकतेनुसार बदल करणार
पंढरपूर-फलटण व टेंभुर्णी-पंढरपूर या मार्गाने पंढरपुरात येणाऱ्या मार्गांचे आता रूंदीकरण, सुशोभिकरण होत आहे. मात्र येथून पुढे सरगम चौकातून शहरात येणाऱ्या मार्गाचे सुशोभिकरण करताना कायम अडसर ठरणारा सरगम चौकातील रेल्वे पूल कायम चर्चेत असतो. मात्र वाखरी-पंढरपूर या मार्गाचे रूंदीकरण, सुशोभिकरण करताना हा रेल्वे पूल विचारात घेऊन सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. त्यानुसार आवश्यकतेनुसार या रेल्वे पुलामध्ये बदल करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पावसाळा व अन्य वेळी कायम अडसर ठरणाऱ्या रेल्वे पुलाचेही काम आता मार्गी लागणार असल्याने वाहतुकीत सुलभता येणार आहे.


























































