
सोशल मीडियावरील एका अज्ञात मैत्रीने मुंबईतील एका 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीला हादरवून टाकले आहे. प्रेम, सहानुभूती आणि खोट्या मजबुरींच्या नावाखाली त्यांना 9 कोटींचा गंडा घातला आहे. 21 महिन्यांत 734 वेळा व्यवहार करुन हा गंडा घालण्यात आलेला आहे.
मुंबईतील एका 80 वर्षीय वृद्धाला ऑनलाइन प्रेम प्रकरण महागात पडले आहे. एकामागून एक, तिसऱ्या आणि नंतर चौथ्या महिलेच्या जाळ्यात अडकून, या व्यक्तीने 21 महिन्यांत आपल्या संपूर्ण आयुष्याची सुमारे 9 कोटींची कमाई गमावली. यानंतर त्या वृद्धाला समजले की, प्रेमाच्या नावाखाली त्यांची फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला
सायबर पोलिसांनी फसवणुकीच्या या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 21 महिन्यांत 4 वेळा वृद्धाची फसवणूक करणारा व्यक्ती तोच आरोपी आहे की वेगवेगळ्या लोकांनी त्याची फसवणूक केली हे पोलीस प्रथम शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
सायबर फसवणुकीचे बळी ठरलेले 80 वर्षीय वृद्ध आपल्या मुलगा आणि सुनेसह मुंबईत राहतात. एप्रिल 2023 मध्ये तक्रारदाराने फेसबुकवर शार्वी नावाच्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते आणि तिने त्यांची रिक्वेस्ट स्वीकारली नाही. पण काही दिवसांनी शार्वीने वृद्धाला परत रिक्वेस्ट पाठवली आणि त्यांनी ती स्वीकारली.
दोघांनी ऑनलाइन चॅटिंग सुरू केले आणि नंतर व्हॉट्सअॅप नंबरची देवाणघेवाण केली. शार्वीने सांगितले की, ती तिच्या पतीपासून वेगळी आहे आणि तिच्या मुलांसोबत राहते. तिने हळूहळू तिच्या मुलांच्या आजाराचे निमित्त करून वृद्धाकडे पैसे मागायला सुरुवात केली आणि त्याने पैसे दिले.
शार्वी त्या वृद्धाशी बोलत असतानाच, कविता नावाच्या एका महिलेने व्हॉट्सअॅपवर त्या वृद्धाला मेसेज पाठवला. कविताने सांगितले की, शार्वीने तिला नंबर दिला आहे. कविता थेट मुद्द्यावर आली आणि म्हणाली की, तिला मैत्री करायची आहे. त्या वृद्धाने ही संधीही सोडली नाही. कविताने अश्लील मेसेज पाठवून त्यांच्याशी जवळीक वाढवली आणि नंतर आजारी मुलांच्या उपचारासाठी पैसे मागण्याचा तोच जुना फॉर्म्युला वापरला. वृद्धाने कवितालाही पैसे देण्यास सुरुवात केली.
डिसेंबर 2023 मध्ये आणखी एक नवीन पात्र दिनाज आली. तिने शार्वीची बहीण असल्याचे सांगितले आणि सांगितले की, शार्वी आता या जगात नाही. दिनाजने सांगितले की, मरण्यापूर्वी शार्वीला तिचे हॉस्पिटल बिल द्यावे अशी इच्छा होती. दिनाजने व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट देखील पाठवले आणि पैसे उकळले. नंतर वृद्धाने पैसे परत मागितले तेव्हा दिनाजने आत्महत्या करण्याची धमकी दिली.
यानंतर जास्मिन नावाच्या एका महिलेने दिनाजची मैत्रीण म्हणून पुन्हा त्यांच्याशी ओळख केली. त्या वृद्धाने तिलाही पैसे पाठवले. वृद्धाची सर्व बचत संपली तेव्हा त्यांनी आपल्या सुनेकडून 2 लाख उधार घेतले, परंतु मागण्या थांबल्या नाहीत. एप्रिल 2023 ते जानेवारी 2025 पर्यंत, वृद्धाने एकूण 734 वेळा पैसे पाठवले. ही एकूण रक्कम अदमासे 9 कोटी इतकी होती. शेवटी त्यांनी मुलाकडे 5 लाख रुपये मागितले. मुलाला संशय आला आणि त्याने त्याला संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारले. वृद्धाने सत्य सांगितले तेव्हा मुलाला धक्का बसला.
संपूर्ण फसवणूक उघडकीस आल्यानंतर, वृद्धाला खूप धक्का बसला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांना तपासणीत असे आढळून आले की, त्यांना डिमेंशियाची समस्या आहे.